
कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे महत्त्वाचं आहे. याशिवाय इतरही अनेक उपाय लोकांनी केले.
लंडन - कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरू झाल्यापासून लोकांनी खबरदारी घ्यायला सुरु केली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे महत्त्वाचं आहे. याशिवाय इतरही अनेक उपाय लोकांनी केले. तसंच इतरही काही घरगुती उपाय लोक करत होते. यामध्ये गरम पाणी पिणे, त्यातही पाणी पिण्याचं प्रमाण जास्त असायला हवं असे अनेक उपाय केले जात होते. अशाच एका उपायाचा वापर करणं रुग्णाला महागात पडलं आहे. ल्यूक विल्यम्सन यांनी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे स्वत:च्या जीवावर वेगळंच संकट ओढवून घेतलं आहे.
हे वाचा - ऑक्सफर्ड लशीला ब्रिटनने दिली मान्यता; फायझरनंतर कोविशिल्डचे होणार लशीकरण
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ल्यूक विल्यम्सन यांना आपल्याला कोरोना झाला आहे अशी भीती वाटली. त्यानंतर कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांनी दररोज पाणी पिण्याचं प्रमाण दुप्पट केलं. सामान्यपणे एक ते दोन लीटर पाणी माणसाला पुरेसं असतं. मात्र ल्यूक दररोज चार ते पाच लीटर पाणी प्यायला लागले. त्यांनी असं अनेक दिवसं केलं आणि यामुळे प्रकृतीवर विपरित परिणाम झाला. 34 वय असलेले ल्यूक अचानक बेशुद्ध पडले.
ल्यूक यांच्या पत्नीने सांगितलं की, सायंकाळी ते अंघोळ करण्यासाठी गेले आणि बाथरूममध्येच पडले. लॉकडाऊन असल्यानं कोणत्याच शेजाऱ्यांकडून मदत मिळू शकली नाही. अॅम्ब्युलन्स बोलावली तर ती 45 मिनिटांत आली. तोपर्यंत जवळपास 20 मिनिटे ल्यूक बेशुद्धावस्थेत होते. यामुळे मला खूप भीती वाटत होती असं ल्यूक यांच्या पत्नीने सांगितले.
पाहा VIDEO : पॉपकॉर्न खा, कोरोनाविरोधात इम्यूनिटी वाढवा; पाकिस्तानी डॉक्टरचा अजब दावा
अचानक पडल्यानं ल्यूक हे बेशुद्ध पडले होते. त्यानंतर ल्यूक यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा ल्यूक यांच्या शरिरात पाणी जास्त प्यायल्याने मीठाचं प्रमाण कमी झाल्याचं आढळलं. डॉक्टरांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून ते जास्त पाणी पित होते. त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी झालं आणि तब्येत इतकी बिघडली. त्यांना आयसीयुमध्येही ठेवण्यात आलं होतं. परिस्थिती इतकी बिघडली होती की ल्यूक यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती.