esakal | Thank You India! लसीच्या मदतीमुळे भारावला कॅनडा; होर्डींग्ज लावून भारताचे आभार
sakal

बोलून बातमी शोधा

Canada Thanked India

'वसुधैव कुटुम्बकम्' या आपल्या उक्तीनुसारच देश मार्गक्रमण करत असून भारताच्या याच मदतीच्या स्वभावाचं कौतुक आता कॅनडाने केलं आहे.

Thank You India! लसीच्या मदतीमुळे भारावला कॅनडा; होर्डींग्ज लावून भारताचे आभार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर अद्यापही सुरुच आहे. गेल्या वर्षी याच काळात कोरोनाने जगभरात थैमान घालायला सुरुवात केली होती. भारतात कोरोनाचे एकदोन रुग्ण सापडायला सुरुवात झाली होती. मात्र, आता एका वर्षानंतर जगभरात कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. भारतानेही दोन लसींना मान्यता दिली असून जगातील सर्वांत मोठ्या लसीकरणाची मोहीम सध्या भारतात सुरु आहे. भारताने इतर देशांना देखील लसीचा पुरवठा करुन मदत केली आहे. भारताने नेपाळ, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि कॅनडापर्यंत अनेक देशांना कोरोना लसीचा पुरवठा करुन जगभरात आपल्या मानवतेचं दर्शन घडवलं आहे. 'वसुधैव कुटुम्बकम्' या आपल्या उक्तीनुसारच देश मार्गक्रमण करत असल्याचं पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलं आहे. आणि भारताच्या याच मदतीच्या स्वभावाचं कौतुक आता कॅनडाने केलं आहे. कॅनडामध्ये पंतप्रधान मोदींचे आणि भारताचे आभार मानणारे होर्डींग्स लावण्यात आले आहेत. 

भारताने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीकडून तयार केल्या गेलेल्या कोविशिल्ड लसीच्या पाच लाख खुराकांची पहिली खेप अलिकडेच कॅनडाला पाठवली होती. कॅनडाने या मदतीसाठी भारताचे आभार मानले आहेत. कॅनडाच्या ग्रेटर टोरंटोमध्ये काही बिलबोर्ड लावण्यात आले आहेत, ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे तसेच त्यावर त्यांचे आणि भारताचे आभार मानण्यात आले आहेत. 

हेही वाचा - आत्मनिर्भर भारतामागे भगवद्गीतेची प्रेरणा; PM मोदींनी लाँच केलं गीतेचं किंडल व्हर्जन

कॅनडामध्ये लावण्यात आलेल्या बिलबोर्डवर पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत लिहण्यात आलंय की, कॅनडाला कोविड लस देण्यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार. भारताकडून कॅनडाला लसीचे 20 लाख खुराक दिले जाणार आहेत. यासाठी कॅनडाने भारताचे आभार मानले आहेत. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरवातीला कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन ट्रुडो यांच्यासोबत बातचित केली होती. या दरम्यान त्यांनी कॅनडाच्या राष्ट्राध्यक्षांना आश्वासन दिलं होतं की, भारत कॅनडाच्या कोरोना लसीकरणाच्या प्रयत्नांमध्ये मदत करेल. तर कॅनडाच्या राष्ट्राध्यक्षांनी याला प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, जर जगात कोरोना विरोधातील लढा यशस्वी झाला तर तो भारताच्या औषध निर्मितीच्या क्षमतेमुळेच होईल. 
 

loading image