संसदेत हिंसाचार सुरू असताना ट्रम्प कुटुंबीय सेलिब्रेशनमध्ये मग्न; व्हायरल व्हिडिओमुळे संताप

टीम ई सकाळ
Friday, 8 January 2021

ट्रम्प समर्थक तोडफोड आणि मारहाण करत होते त्यावेळी ट्रम्प यांचे कुटुंबिय टीव्हीवर हे सर्व लाइव्ह बघत होते. याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ट्रम्प यांच्या मुलानेच तो शूट केला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांनी अभूतपूर्व असा गोंधळ घातल्यानंतर आता उरलेला काही दिवसांचा कार्यकाळ ट्रम्प पूर्ण करू शकतील की नाही असा प्रश्न आहे. समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे ट्रम्प अडचणीत येण्याची शक्यता असून आता आणखी एका व्हिडिओमुळे ते कचाट्यात सापडू शकतात. इटलीची राजधानी रोम जळत असताना सम्राट निरो फिडेल वाजवण्यात दंग झाला होता. आता तशीच काहीशी कृती ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांकडून घडल्याचं समोर आलं आहे. ज्यावेळी ट्रम्प समर्थक तोडफोड आणि मारहाण करत होते त्यावेळी ट्रम्प यांचे कुटुंबिय टीव्हीवर हे सर्व लाइव्ह बघत होते. याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ट्रम्प यांच्या मुलानेच तो शूट केला आहे. 

व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्यासह त्यांची मुलगी इव्हांका दोन तीन वेगवेगळ्या टीव्ही स्क्रीनवर कॅपिटॉलमध्ये होत असलेला हिंसाचार पाहताना दिसतात. बँकग्राउंड म्युझिकही सुरू असून यात ट्रम्प आणि इव्हांका गंभीर वाटतात तर त्यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर, गर्लफ्रेंड किम्बर्ली आणि चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज आनंदी दिसतात.

गुरुवारी अमेरिकेच्या संसदेत आत आणि बाहेर झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा आणि महिलेचा समावेश आहे. पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू शुक्रवारी झाला. 

हे वाचा - अमेरिकेत हिंसाचारावेळी तिरंगा कुणी फडकवला? व्यक्तीची ओळख पटली

ऑस्ट्रेलियन संकेतस्थळ news.com.au ने ट्रम्प कुटुंबियांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. ट्रम्प कुटुंबियांशिवाय आणखी काही लोक या व्हिडिओमध्ये दिसतात. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि त्याची गर्लफ्रेंड किम्बर्लीसुद्धा आहेत. याशिवाय काही घोषणा ऐकू येतात. ट्रम्प यांच्याकडून ही लढाई सुरु ठेवण्यास सांगितलं जातं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हातात एक टोपी असून त्यावर मेक अमेरिका ग्रेट अगेन असंही लिहिलं आहे. 

हे वाचा - ट्रम्प म्हणे, मी हिंसेने व्यथित, US कायद्याचं राज्य; सत्तेचे सुव्यवस्थित करेन हस्तांतरण

ट्रम्प यांनी गुरुवारी इलेक्टोरल कॉलेज मतांच्या मोजणीआधी भाषण दिलं होतं. यामध्ये समर्थकांना पराभव स्वीकारू नका असं म्हटलं होतं. व्हायरल व्हिडिओत ट्रम्प यांचा मुलगा समर्थकांच्या कामावर आनंदी असल्याचं म्हणतो. तर त्याची गर्लफ्रेंड किम्बर्ली आपण योग्य मागणीसाठी लढू शकतो असं म्हणताना दिसते. ट्रम्प कुटुंबिया सेल्फीसुद्धा काढतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा अत्यंत नीच प्रकार असल्याचं मत युजर्सनी व्यक्त केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: capitol violence trump family busy in enjoy tv screen watching video viral