अमेरिकेत हिंसाचारावेळी तिरंगा कुणी फडकवला? व्यक्तीची ओळख पटली

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 8 January 2021

अमेरिकी संसद कॅपिटल हिलच्या बाहेर बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिंसा घडवून आणली होती

वॉशिंग्टन- अमेरिकी संसद कॅपिटल हिलच्या बाहेर बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिंसा घडवून आणली होती. यादरम्यान कॅपिटल हिलच्या बाहेर भारतीय झेंडा तिरंगा फडकवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. तिरंग्याला भारतीय वंशाचे विन्सन पलथिंगल उर्फ विंसेट जेवियर यांनी फडकवलं होतं. विन्सन आंदोलनादरम्यान कॅपिटल हिलच्या बाहेर उपस्थित असणाऱ्या लोकांच्या सोबत होते आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली होती. 

दिलासादायक: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही फायझर लस पुरुन उरणार; नव्या संशोधनात...

विन्सन यांनी पहिल्यांदा फेसबुकवर कॅपिटल हिलच्या बाहेर तिरंगा फडकावत असल्याची पोस्ट केली होती, त्यानंतर त्यांनी पोस्ट डिलीट केली. विन्सन यांनी दावा केलाय की, 2020 च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही असाच दावा केला आहे. पण, निवडणूक अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. केरळच्या मनोरमा न्यूजच्या बातमीनुसार विन्सन कोच्चीच्या चंबाक्कराचे रहिवाशी आहेत. 

सांगितलं जातंय की, ट्रम्प यांच्या प्रशासनाने राष्ट्रपतीच्या निर्यात परिषदेमध्ये भारतीय वंशाचे विन्सन यांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. विन्सनने मनोरमा न्यूजला सांगितलं की ते निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याविरोधात निदर्शने करण्यासाठी गेले होते, हिंसाचाराबाबत त्यांचे काही देणे-घेणे नाही. विन्सन यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटलं होतं की, ट्रम्प यांच्या रॅलींमध्ये खूप मजा येते. पण, त्यांनी ही पोस्ट नंतर डिलीट केली. 

दुपारच्या बातम्या - कोरोना लस ते भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीचे अपडेट वाचा...

दरम्यान, अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला असूनही तो स्वीकारण्यास नकार देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी उद्दामपणाचे प्रदर्शन घडवत अमेरिकेच्या कॅपिटल इमारतीबरोबरच देशाच्या लोकशाहीवरही हल्ला केला. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला. या संघर्षामुळे अध्यक्षीय निवडीवर शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेतही अडथळे आले. 

ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ते गोंधळ घालतील, अशी शंका असल्याने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, पोलिसांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या समर्थकांनी थेट कॅपिटलची सुरक्षा यंत्रणा भेदून आत घुसखोरी करत तोडफोड केली. या धक्कादायक प्रकारामुळे मतमोजणी प्रक्रियेत अडथळा येऊन संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष माइक पेन्स आणि इतर सदस्यांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. या समर्थकांचा पोलिसांबरोबरही संघर्ष झाला. या संघर्षात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनेक जणांना अटकही केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tricolor waved at capitol hill violence america person identified