कॅस्ट्रो निव्वळ एक निर्दय हुकूमशहा: ट्रम्प

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

अत्याचार, चौर्य, सांगता न येण्याजोगे कष्ट, गरिबी आणि नाकारण्यात आलेले मुलभूत मानवाधिकार हाच फिडेल कॅस्ट्रो यांचा वारसा आहे. कॅस्ट्रो यांच्या मृत्युमुळे आता अंतिमत: क्‍युबामधील जनता अत्याचाराचा भूतकाळ मागे ठेवून स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करेल, अशी आशा आहे.

नवी दिल्ली - क्‍युबाचे जगप्रसिद्ध क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्या मृत्युनंतर जगभरातील देशप्रमुखांनी व नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असली; तरी अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र कॅस्ट्रो यांच्या रुपाने जगाने एका "निर्दयी हुकूमशहा'स निरोप दिल्याची कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"आज आपल्याच लोकांवर सुमारे सहा दशकांपर्यंत अत्याचार करणाऱ्या एका निर्दय हुकूमशहाचे निधन झाले आहे. अत्याचार, चौर्य, सांगता न येण्याजोगे कष्ट, गरिबी आणि नाकारण्यात आलेले मुलभूत मानवाधिकार हाच फिडेल कॅस्ट्रो यांचा वारसा आहे. कॅस्ट्रो यांच्या मृत्युमुळे आता अंतिमत: क्‍युबामधील जनता अत्याचाराचा भूतकाळ मागे ठेवून स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करेल, अशी आशा आहे. या स्वातंत्र्यावर त्यांचा निश्‍चितच अधिकार आहे. क्‍युबाचा प्रवास आता समृद्धी आणि स्वातंत्र्याकडे व्हावा, यासाठी आमचे प्रशासन नक्कीच प्रयत्न करेल. एके दिवशी स्वतंत्र क्‍युबा पहावयास मिळेल, अशी आम्हाला आशा आहे,'' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचा पाठिंबा असलेले सरकार उलथवित कॅस्ट्रो यांनी 1959 मध्ये क्‍युबाची सत्ता हस्तगत केली होती. यानंतर याआधीच्या सरकारशी संबंधित असलेल्या किमान 583 सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याशिवाय, स्वतंत्र वर्तमानपत्रे बंद करण्यात आली होती; तसेच समलैंगिक नागरिकांना "पुनर्शिक्षणा'साठी कॅम्पमध्ये धाडण्यात आले होते. किंबहुना, कॅस्ट्रो यांनी 1964 मध्ये आपल्या ताब्यात 15 हजार राजकीय कैदी असल्याचे मान्य केले होते.

कॅस्ट्रो यांच्या मृत्युनंतर मियामी या अमेरिकन शहरामधील स्थलांतरित क्‍युबन-अमेरिकन नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन त्यांच्या मृत्युचा जल्लोष साजरा केला होता.

Web Title: Castro a 'brutal dictator', says US President-elect Donald Trump