चीन-अमेरिका वाद टोकाला; अमेरिकेने ध्वज उतरविला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

अमेरिकेने ह्यूस्टनमधील चीनची कौन्सुलेट बंद करण्याचा व चीनने अमेरिकेची चेंगडूमधील कौन्सुलेट बंद करण्याचा आदेश दिला.

चेंगडू (चीन) : अमेरिकी वाणिज्य दूतावास बंद करण्याची औपचारिक प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. तीन दिवसांची मुदत संपल्यानंतर अमेरिकी राजनैतिक कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडले. त्याबरोबरच अमेरिकी ध्वजही खाली उतरविण्यात आला. गेल्या आठवड्यात अमेरिका व चीन यांच्यात तणाव निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्याचेच परिणाम अमेरिकेकडून घेण्यात येणाऱ्या या निर्णांमध्ये दिसत आहेत.  अमेरिकेने ह्यूस्टनमधील चीनची कौन्सुलेट बंद करण्याचा व चीनने अमेरिकेची चेंगडूमधील कौन्सुलेट बंद करण्याचा आदेश दिला. आता वाशिंगटनमधील दूतावासाव्यतिरितक्त न्यू यार्क, शिकागो, सॅनफ्रान्सिस्को, लास एन्जल्स व ह्यूस्टन अशा चीनच्या पाच कौन्सुलेट्स आहेत. तर चीनमध्ये वूहान, ग्वांगझाव, चेंगडू, शांघाय व शेनयांग येथे अमेरिकेच्या कौन्सुलेट्स व बीजिंगमध्ये दूतावास आहे.

ह्युस्टनमधील चिनी वकिलात बंद करण्याचे फर्मान अमेरिकेने काढले. त्याची परतफेड चीनने केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांतील संबंध आणखी विकोपाला गेले. गेले दोन दिवस दूतावास खाली करण्यात कर्मचारी व्यस्त होते. परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. कर्मचारी दूतावास सोडत असताना काही स्थानिकांनी मोबाईलवर छायाचित्रे घेतली. अनेकांनी चीनचे राष्ट्रध्वज झळकावले. दरम्यान, दूतावासाच्या नावाचा फलकही काढण्यात आला.

हे वाचा -अमेरिका-चीन संबंधांचे काटे उलट्या दिशेने

चीनी परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले की, मुदत उलटून जाताच आमचे कर्मचारी इमारतीत गेले आणि त्यांनी ताबा घेतला. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, तिबेटसह पश्चिम चीनमधील नागरिकांशी आमच्या संबंधांचे केंद्रस्थान म्हणून हा दूतावास गेली 35 वर्षे उभा होता. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या निर्णयामुळे आम्ही निराश झालो आहोत. या महत्त्वाच्या भागातील लोकांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न आम्ही चीनमधील इतर केंद्रांच्या मार्फत सुरू ठेवू.

हे वाचा - लष्करी ड्रोन निर्यातीला डोनाल्ड ट्रम्प यांची सहमती

चीनमधून जगभर पसरलेल्या करोनाचा जबरदस्त फटका अमेरिकेला बसला आहे. त्यातून बाहेर कसे पडायचे असा प्रश्न अमेरिकेचे अध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लागली आहे. दरम्यान, अमेरिकेतील लोकशाही व खुल्या अर्थव्यवस्थेच्या मदतीने चीनने अनेक वर्ष औद्योगिक व व्यावसायिक गुपिते व तंत्रज्ञान चोरल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. तसंच ट्रम्प यांच्याकडून सातत्याने असे आरोप केले जात आहेत. 

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chengdu US consulate american officer left and flag off