चीनमध्ये कोरोनाग्रस्त संशयितांची धरपकड; परिस्थिती हाताबाहेर

टीम ई-सकाळ
Saturday, 8 February 2020

चीनमध्ये आज दिवसभरातच या विषाणूचा संसर्ग झाल्याने ८६ जण मरण पावल्याने मृतांची संख्या ७२२ वर पोचली आहे.

बीजिंग : कोरोनाच्या संसर्गामुळे हतबल झालेल्या चीनने आता संशयित रुग्णांची थेट धरपकड करायला सुरुवात केली असून, हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहानमध्ये स्थानिक अधिकारी आणि डॉक्टर घरात घुसून लोकांना फरफटत बाहेर काढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक चिनी प्रशासनाच्या हुकूमशाही कृत्याचे दर्शन घडविणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. धरपकड करण्यात आलेल्यांची रवानगी थेट छावण्यांमध्ये केली जाणार आहे. केवळ मास्क न घातल्यामुळेही लोकांची धरपकड केली जात आहेत. कोरोनाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी चीन सरकारने ‘पीपल्स वॉर’ची घोषणा केली असून, यान्वये संशयितांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये आज दिवसभरातच या विषाणूचा संसर्ग झाल्याने ८६ जण मरण पावल्याने मृतांची संख्या ७२२ वर पोचली आहे. आज मरण पावलेले बहुतांश लोक हे हुबेई प्रांतातील आहेत. दरम्यान, जगभरात या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३४ हजार आठशेवर पोचली आहे, तर प्रत्यक्ष चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३४ हजार ५४६ वर पोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जपानमध्येही कोरोनाचा संसर्ग झालेले आणखी तीन रुग्ण समोर आले असून, यामुळे येथील संसर्ग झालेल्यांची संख्या ६४ वर पोचली आहे. हे सर्व रुग्ण हे वेगळ्या ठेवण्यात आलेल्या जहाजांवरील असल्याची माहिती जपान सरकारने दिली आहे.

आणखी वाचा - निर्भया प्रकरण; 'तर दोषींना फाशी देणे पाप', कोर्टाने याचिका फेटाळली

चीनमधील ३१ प्रांतांमध्ये आज नव्याने ३,३९९ जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले. हुबेई प्रांताप्रमाणेच हेईलाँगजीजँग, बीजिंग, हेनान आणि गान्सू या भागांमध्ये विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हाँगकाँगमध्ये या विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाला असून, मकाऊमध्ये दहा आणि तैवानमध्ये सोळा संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूच्या संपर्कात आलेल्या ३ लाख ४५ हजार लोकांची ओळख पटविण्यात आली होती. त्यातील २६ हजार ७०२ जणांना शुक्रवारीच रुग्णालयातून सोडण्यात आले. अजूनही १.८९ लाख लोकांवर वैद्यकीय यंत्रणेचे लक्ष आहे. 

हुबेईमधील विद्यार्थी मायदेशी 
कोची : चीनमधील कोरोनाग्रस्त हुबेई प्रांतात अडकून पडलेले केरळमधील पंधरा विद्यार्थी आज मायदेशी परतले. या विद्यार्थ्यांना घेऊन आलेले विमान आज येथील विमानतळावर उतरल्याची माहिती सूत्रांनी दिली. विमानतळावरच या विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंगही घेण्यात आले. सुरुवातीस या विद्यार्थ्यांना कुनमिंग विमानतळावरून बँकॉक येथे आणण्यात आले आणि तेथून एअर एशियाच्या विशेष विमानातून ते कोचीत आले. कोची विमानतळावरून या विद्यार्थ्यांना विशेष रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात नेण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात वेगळ्या खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. 

जपानमधील भारतीयांची विनंती 
जपानमध्ये डायमंड प्रिन्सेस या आलिशान जहाजावर अडकून पडलेल्या भारतीयांनी सरकारकडे मदत मागत आमची येथून तातडीने सुटका करा, अशी विनंती केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीपोटी जपान सरकारने अनेक नौका आणि जहाजांना वेगळे केले असून, यामध्ये डायमंड प्रिन्सेसचाही समावेश आहे. सध्या योकोहामा बंदरावर ही नौका असून, तिच्यावर तीन हजार ७०० प्रवासी आहेत. त्यामध्येच १३८ भारतीयांचाही समावेश आहे. या जहाजावरील या भारतीय कर्मचाऱ्याने आज सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करीत भारत सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. विनयकुमार सरकार, असे या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china arrested suspended coronavirus sending camps