"कोरियां'च्या संघर्षात मध्यस्थीचा चीनचा प्रयत्न

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

लष्करी सराव वा क्षेपणास्त्र चाचण्या थांबविणे हे राजनैतिक चर्चा पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील प्रयत्नाचे पहिले पाऊल ठरु शकेल, अशी भूमिका चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे

बीजिंग - उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे जागतिक राजकारणामध्ये निर्माण होणारा तणाव निवळावा, या उद्देशार्थ चीनने उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रे व अण्वस्त्रांच्या घेतल्या जाणाऱ्या चाचण्या थांबवाव्यात, असे आवाहन केले आहे. याचबरोबर, अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्याकडून करण्यात येणारे संयुक्त लष्करी सरावही तत्काळ थांबविण्यात यावेत, असेही चीनने म्हटले आहे. या लष्करी सरावांमुळे उत्तर कोरिया संतप्त असल्याचे मानले जात आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी यासंदर्भातील आवाहन केले आहे. उत्तर कोरियाने काल (सोमवार) आंतरराष्ट्रीय निर्बंध झुगारुन देत चार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनकडून हे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर कोरियाचे आक्रमक धोरण व दक्षिण कोरिया व अमरिकेकडून त्यास देण्यात येणाऱ्या उत्तरामुळे या भागात संघर्षाचा स्फोट होण्याची भीती वांग यांनी व्यक्त केली आहे.

यामुळेच, लष्करी सराव वा क्षेपणास्त्र चाचण्या थांबविणे हे राजनैतिक चर्चा पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील प्रयत्नाचे पहिले पाऊल ठरु शकेल, अशी भूमिका चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: China calls on N Korea to suspend missile and nuclear tests