भारत पाकवरील दबाव वाढवेल- चीनचा दावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, अशी भारताची मागणी आहे. मात्र, भारताच्या राष्ट्रसंघामधील या प्रस्तावाला चीनने दोन वेळेस तांत्रिक कारण दाखवित आडकाठी आणली आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या या निर्णयाचे चीनने समर्थनही केले होते.

बीजिंग : "दहशतवादविरोधी शस्त्रा'चा आधार घेत भारत पाकिस्तानवरील "लष्करी दबाव' वाढवू शकतो आणि त्यामुळे या प्रदेशातील राजकारणात इतरही काही जणांना घुसण्याची संधी मिळेल, असा दावा चीनने आज केला आहे. भारताच्या या खेळीमुळेच मसूद अझरला संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दहशतवादी घोषित करण्यास चीनने प्राथमिक विरोध दर्शविला असल्याचेही समर्थन या वेळी करण्यात आले.

चीनमधील ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्रामधील संपादकीयमध्ये भारतावर आरोप करण्यात आले आहेत. "मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याच्या मागणीमागे भारताची स्वत:ची काही कारणे आहेत. मात्र, दहशतवादविरोधाच्या शस्त्राआडून भारत पाकिस्तानवरील लष्करी दबाव वाढविण्याची शक्‍यता असून, यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढेल,'' असे या वृत्तपत्राद्वारे चीनने म्हटले आहे. 

"भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वाद दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे अद्यापही तसाच आहे. त्यामुळे कोणालाही एकाला बळ मिळण्यासारखी कृती राष्ट्रसंघाकडून होऊ नये,' असेही चीनने म्हटले आहे. असे केल्यास इतर देशांना हस्तक्षेप करण्याची संधी मिळण्याची भीती चीनने व्यक्त केली आहे. दोन्ही देशांचा शेजारी असल्याने चीनची यामध्ये महत्त्वाची भूमिका असेल, असाही दावा चीनने केला आहे.

Web Title: china claims india will pressurize pakistan