धक्कादायक : चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना दिलं जातंय कासवाचं मांस

टीम ई-सकाळ
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

वुहान शहरामध्ये सर्वाधिक कोरोना ग्रस्त रुग्ण आहेत. तेथे या रुग्णांना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी कासवाचे मांस दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बीजिंग : चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 750च्या वर गेली असून, जवळपास 35 हजार जणांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. वुहान शहरामध्ये सर्वाधिक कोरोना ग्रस्त रुग्ण आहेत. तेथे या रुग्णांना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी कासवाचे मांस दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात डेली मेलने वृत्त दिले असून, डेली मेलच्या हवाल्याने भारतातही हे वृत्त प्रसिद्ध करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे डेली मेलचे म्हणणे
डेली मेल ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहान शहरातील अनेक हॉस्पिटल्समध्ये कोरोनाचे रुग्ण दाखल आहेत. त्यांना रात्रीच्या जेवणात कासवाचे मांस देण्यात आले आहे. चीनमधील एका व्यक्तीने याचा दावा केल्यानंतर, याला वाचा फुटली आहे. संबंधित व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे. चीनच्या पाक शैलीमध्ये कासवाचे मांस हे पोषक मानले जाते. चीनमध्ये आढळणाऱ्या कासवांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटिन असते. त्यामुळं आजारी व्यक्ती लवकर बरी होत असल्याचा दावा चीनमध्ये केला जातो. चीनमध्ये सध्या कासवाचा सूप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मुळात परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळं कोणत्या मेसेजवर किती विश्वास ठेवावा, असा चीनमधील सामान्य माणसांचा गोंधळ उडाला आहे. 

आणखी वाचा - चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची धरपकड; परिस्थिती हाताबाहेर

काय खरे, काय खोटे?
चीनमध्ये वटवाघुळाच्या मांसाचा सूप प्यायल्याने हा व्हायरस माणसांमध्ये पसरल्याची चर्चा आहे. पण, त्याला शास्त्रज्ञांनी पुष्टी दिलेली नाही. आता कासवाचे मांस खाण्यासाठी देण्याला शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतल्याचं डेली मेलनं म्हटलंय. दुसरीकडं वटवाघुळाच्या मासातून नव्हे तर, पैंगोलिन या एक प्रकारच्या पालिच्या मांसामुळं हा व्हायरस मानवी शरिरात घुसल्याची चर्चा आहे. पण, या दोन्ही निव्वळ शक्यता आहे. त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. सोशल मीडियावर चीनमधील खाद्य संस्कृतीवरून अनेक मेसेज व्हायरल होताना दिसत आहे. त्यात या सगळ्याचा उल्लेख असला तरी यातलं किती खरं आणि किती खोटं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china coronavirus patients tortoise meat food culture social media