धक्कादायक! चीनने ट्रायल न घेताच महिनाभर आधी दिली लस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी सांगितलं होतं की, 22 जुलैपासूनच लोकांना व्हॅक्सिनचा डोस दिला जात आहे. मात्र, आयोगाने त्यांच्या चार व्हॅक्सिनपैकी कोणतं व्हॅक्सिन लोकांना दिलं हे स्पष्ट केलं नव्हतं.

बिजिंग - जगभरात कोरोना पसरवणाऱ्या चीनने एक महिना आधीच त्यांच्या लोकांना कोरोना व्हॅक्सिन दिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी सांगितलं होतं की, 22 जुलैपासूनच लोकांना व्हॅक्सिनचा डोस दिला जात आहे. मात्र, आयोगाने त्यांच्या चार व्हॅक्सिनपैकी कोणतं व्हॅक्सिन लोकांना दिलं हे स्पष्ट केलं नव्हतं. एवढंच नाही तर आयोगाने असाही दावा केला होता की, कोरोना व्हॅक्सिनचा लोकांवर कोणताही वाईट परिणाम झालेला नाही. 

चीनचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे संचालक झेंग झोंगवेई यांनी म्हटलं की, व्हॅक्सिन सुरुवातीच्या टप्प्यात इमिग्रेशन अधिकारी आणि मेडिकल स्टाफला देण्यात आलं. चीनमध्ये आता परदेशातून कोरोना व्हायरसचे रुग्ण येत आहेत. त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना कोरोना व्हॅक्सिन देणं गरजेचं होतं. तर आरोग्य अधिकारी कोरोनाबाधितांवर उपाचर करत असल्यानं त्यांनाही व्हॅक्सिनचा डोस दिला. 

हे वाचा - कोरोना संसर्गाची दुसऱ्यांदा बाधा शक्य; पुरावा मिळाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

रशियाने 11 ऑगस्टला कोरोना व्हॅक्सिन तयार केल्याची घोषणा केली होती. त्याआधीच चीनने त्यांच्या लोकांना कोरोना व्हॅक्सिन द्यायला सुरुवात केली होती. रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी क्लिनिकल ट्रायल टाळून या व्हॅक्सिनचा वापर सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. क्लिनिकल ट्रायलचे निकष पूर्ण न करता याचा वापर केला जात आहे. संपूर्ण जग कोरोना व्हायरसवर व्हॅक्सिन तयार करण्यासाठी आणि माणसांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी संघर्ष करत असताना चीनने व्हॅक्सिनबाबत असा प्रकार केल्यानं त्यांच्या हेतुवर शंका घेतली जात आहे.  

काही दिवसांपूर्वी पापुआ न्यू गिनीने घोषणा केली होती की, ते चीनमधील खाण कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याची तयारी करत आहेत. या लोकांना चीनच्या सरकारने कोरोना व्हायरसवर व्हॅक्सिनच्या चाचणीमध्ये घेतलं होतं.  व्हॅक्सिनचा डोस दिलेल्या चिनी लोकांमुळे धोका निर्माण होऊ शकतो असं कारण पापुआ न्यू गिनीने सांगितलं होतं. यामुळे चीन आणि पापुा न्यू गिनी यांच्यात वादही निर्माण झाला आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रशियाने क्लिनिकल ट्रायलची कागदपत्रे न देता व्हॅक्सिन तयार झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर जगभरातून रशियाच्या व्हॅक्सिनवर शंका उपस्थित कऱण्यात आली होती. तेव्हा रशियाने मोठ्या प्रमाणावर व्हॅक्सिनच्या चाचणीला सुरुवात केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 11 ऑगस्टला लस तयार झाली असल्याची घोषणा करताना मुलीला लस टोचल्याचंही सांगितलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china coronavirus vaccine without clinical trial start use from month ago