चीनने पाकला दिल्या सागरी टेहळणी नौका

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानकडून याआधीच सैन्यातील एक नवी "डिव्हिजन' तैनात करण्यात आली आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी एकूण 54 अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे

नवी दिल्ली - "चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर'नजीक असलेल्या संवेदनशील सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी चीनने पाकिस्तानला दोन सागरी टेहळणी नौका दिल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

पाकिस्तानी नौदलाचे कमांडर व्हाईस ऍडमिरल अरिफुल्लाह हुसैनी यांनी या नौका औपचारिकरित्या चीनकडून स्वीकारल्या. पीएमएसएस हिंगोल आणि पीएमएसएस बसोल असे या नौकांचे नामकरण करण्यात आले आहे. हिंगोल व बसोल या बलुचिस्तानमधील दोन प्रमुख नद्या आहेत. पाकिस्तानमधील एक प्रमुख वृत्तपत्र असलेल्या "डॉन'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

"या नौका या पाकिस्तानी नौदलाचा एक भाग बनल्या आहेत. या नौकांच्या समावेशामुळे पाकिस्तानी नौदल अधिक सामर्थ्यशाली बनले आहे,'' अशी प्रतिक्रिया हुसैनी यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली. चीन व पाकिस्तानमधील मैत्री ही दिवसेंदिवस महासागरापेक्षाही सखोल होऊ लागल्याची भावनाही त्यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली.

चीनकडून पाकिस्तानला "दश्‍त'व "झोब' या अन्य दोन नौकाही देण्यात येणार आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानकडून याआधीच सैन्यातील एक नवी "डिव्हिजन' तैनात करण्यात आली आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी एकूण 54 अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. जागतिक राजकारणाचे केंद्रस्थान दक्षिण-पूर्व आशियाकडे झपाट्याने झुकत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उदयास आलेली ही योजना अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

Web Title: China gives Pakistan two ships for security of CPEC