चिनी रेल्वे पुन्हा रेशीममार्गावर

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

चीनच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वे नेटवर्कचा विस्तार तर होईलच; पण त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. चीनच्या पहिल्या मालवाहू रेल्वेने झिजियांग प्रांतातील यिवू शहरातून लंडनकडे धाव घेतली आहे. यिवू हे चीनचे आंतरराष्ट्रीय माल उत्पादक केंद्र म्हणून ओळखले जाते.

 

बीजिंग - पाश्‍चात्त्य देशांसोबतचे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी चीनने लोहमार्गाचा नवा "रेशीममार्ग' पत्करला असून, यासाठी ड्रॅगनने थेट लंडनपर्यंत आपल्या लोहमार्गाचा विस्तार केला आहे. आता बारा हजार किमीचा प्रवास करत चिनी रेल्वे थेट गोऱ्या साहेबांच्या लंडनमध्ये पोचणार आहे. चीनच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वे नेटवर्कचा विस्तार तर होईलच; पण त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. चीनच्या पहिल्या मालवाहू रेल्वेने झिजियांग प्रांतातील यिवू शहरातून लंडनकडे धाव घेतली आहे. यिवू हे चीनचे आंतरराष्ट्रीय माल उत्पादक केंद्र म्हणून ओळखले जाते.

यिवूत कशाचे उत्पादन?
यिवू येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कपडे, दागिने, प्रवासी बॅग, सुटकेस आदींचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे या चिनी उत्पादनांचा दर्जाही उच्च प्रतीचा असतो. आपल्या निर्यात बाजारपेठेला बळ देण्यासाठी चीनने रेल्वेच्या माध्यमातून ही मालवाहतूक सुरू केली आहे. यासाठी चीन सरकारने "वन बेल्ट, वन रोड' (रेशीममार्ग) या धोरणाचा अवलंब केला आहे.

प्रवासाचा अवधी
चीनमधून निघालेल्या मालवाहू गाडीला लंडनमध्ये पोचण्यासाठी अठरा दिवसांचा अवधी लागणार असून, ती बारा हजार किलोमीटर लांबीचे अंतर पार करेल, असे "चायना रेल्वे कार्पोरेशन'ने म्हटले आहे. कझाकस्तान, रशिया, बेलारूस, पोलंड, जर्मनी, बेल्जियम आणि फ्रान्समधून ही गाडी लंडनमध्ये पोचेल. यामुळे या लोहमार्गावरील देशांशीही चीनचे आर्थिक संबंध निर्माण होतील.

लंडन पंधरावे शहर
चीनच्या मालवाहू रेल्वे नेटवर्कशी जोडले गेलेले लंडन हे युरोपातील पंधरावे शहर असून, यामुळे चीन- ब्रिटन व्यापारी संबंध अधिक बळकट होण्यास हातभार लागेल. आता पश्‍चिम युरोपशीही चीनचे घनिष्ठ व्यापारी संबंध निर्माण होतील. आशिया, युरोप आणि आफ्रिकेला जोडल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्यावर चीनचा भर आहे.

चीनचे निर्यात व्यापार
2.27 ट्रिलियन डॉलर (2015)
2.34 ट्रिलियन डॉलर (2014)

Web Title: China launches railway on silk road