43 अ‍ॅपवर बंदी घातल्याने बिथरला चीन; भारतावर केले गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

भारत सरकारने मंगळवारी पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेचं कारण देत 43 अ‍ॅप्सवर बंदीची घोषणा केली. याआधी भारताने जून आणि सप्टेंबर महिन्यात काही अ‍ॅपवर बंदी घातली होती. 

नवी दिल्ली - भारत सरकारने मंगळवारी पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेचं कारण देत 43 अ‍ॅप्सवर बंदीची घोषणा केली. याआधी भारताने जून आणि सप्टेंबर महिन्यात काही अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये सर्वाधिक चीनच्या अ‍ॅप्सचा समावेश होता. आता केंद्राने नवीन 43 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन बिथरले आहे. चीनकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली असून भारताच्या या निर्णयाचा पूर्णपणे विरोध करतो असं म्हटलं आहे. तसंच विरोध करताना त्यांनी भारतावर असाही आरोप केला की भारताकडून अशा कारवाईसाठी सातत्याने देशाच्या सुरक्षेचा वापर केला जात आहे. 

भारताने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, देशाची एकता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या 43 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या या अ‍ॅप्समध्ये डेटिंग अ‍ॅप्सचा समावेश आहे. यात अलीबाबा वर्कबेंच, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड, टायनिजी सोशल, वीडेट(डेटिंग अ‍ॅप), फ्री डेटिंग अ‍ॅप, डेट माय एज, ट्रॅली चायनीज, मँगो टीव्ही, बॉक्स स्टार, हॅप्पी फिश ही अ‍ॅप्स आहेत. 

हे वाचा - जाणून घ्या Google Tasks Mate; घरबसल्या एक्स्ट्रा कमाईसाठी गुगलचा नवीन फंडा

चीनचे प्रवक्ते जी रोन्ग यांनी आरोप केला की, भारत सातत्याने देशाच्या सुरक्षेचं कारण सांगून चीनी मालकी असलेल्या मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालत आहे. चीन याचा विरोध करते. आशा आहे की भारत सर्व कंपन्यांसाठी निष्पक्षपणे आणि कोणताही भेदभाव न करता व्यवहार करेल. यामध्ये सुधारणा होईल अशी आशा आहे. 

भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत आदेश जारी करून ही कारवाई केली आहे. यामध्ये 43 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या अ‍ॅपबाबत मिळालेल्या माहितीनंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या एकतेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करत असल्याचं सांगण्यात आलं होतं. 

हे वाचा - सावधान! WhatsApp OTP Scam मधून हॅकर्स साधतायत निशाणा

भारत सरकारने याआधी 200 पेक्षा जास्त चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली गेली आहे. या अ‍ॅप्समध्ये Baidu, WeChat Reading, Ludo All Star ते PUBG Mobile, PUBG Mobile Lite यांचाही समावेश आहे. याशिवाय भारतात सर्वात प्रसिद्ध शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकवर सुद्धा बंदी घातली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china reaction on india bann 43 app yesterday