कालचक्र पूजेवरून तिबेटींवर दबाव नाही

पीटीआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

चीनच्या दबावामुळे सात हजार पर्यटकांना चीनला परतावे लागल्याचे पूजेच्या आयोजक समितीचे अध्यक्ष कर्मा गेलेक युथोक यांचे म्हणणे आहे

 

बीजिंग - बौद्ध धर्मात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कालचक्र पूजेला न जाण्यासाठी हजारो तिबेटी नागरिकांवर चीन दबाव आणत असल्याचा आरोप चीनने आज फेटाळून लावला आहे. मात्र, ही पूजा म्हणजे चीनविरोधी कल्पनांना प्रोत्साहन देण्याचे हे राजकीय साधन असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांच्या अध्यक्षतेखाली बोधगया येथे 34 वी कालचक्र पूजा या महिन्यात सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातून लाखो भाविक आणि पर्यटक येण्याचा अंदाज आहे. अनेक जण बोधगया येथे हजरही झाले आहेत. मात्र, चीनच्या दबावामुळे सात हजार पर्यटकांना चीनला परतावे लागल्याचे पूजेच्या आयोजक समितीचे अध्यक्ष कर्मा गेलेक युथोक यांचे म्हणणे आहे. मात्र, चीनमधून भारतात पूजेसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारांमध्ये नव्हे, तर काही शेकड्यांतच असल्याचे सांगत चीनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर परतण्याचा कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. तसेच, या पूजेच्या निमित्ताने राजकीय चर्चा होऊन चीनविरोधी मतांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याने या पूजेला चीनचा विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: China Refutes Allegations Pressuring Tibetans Not to Attend Kalachakra