esakal | ‘हत्याकांडा’स चीन जबाबदार - डोनाल्ड ट्रम्प
sakal

बोलून बातमी शोधा

Donald-Trump

चीनच्या अकार्यक्षमतेमुळेच जगभरात कोरोनाचा संसर्ग पसरून ''सामूहिक हत्याकांड'' झाले, अशी टीका करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज चीनवर निशाणा साधला. कोरोनाचा संसर्ग पसरण्यास चीनच जबाबदार असल्याची टीका ट्रम्प आणि इतर अमेरिकी नेते गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.

‘हत्याकांडा’स चीन जबाबदार - डोनाल्ड ट्रम्प

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - चीनच्या अकार्यक्षमतेमुळेच जगभरात कोरोनाचा संसर्ग पसरून ''सामूहिक हत्याकांड'' झाले, अशी टीका करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज चीनवर निशाणा साधला. कोरोनाचा संसर्ग पसरण्यास चीनच जबाबदार असल्याची टीका ट्रम्प आणि इतर अमेरिकी नेते गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज ट्विटरच्या माध्यमातून चीनला लक्ष्य करताना ट्रम्प म्हणाले की, हा सर्व चीनच्या अकार्यक्षमतेचाच परिणाम आहे. त्यामुळेच जगभरात सामूहिक हत्याकांड झाले आहे. सर्वत्र दुःख आणि मृत्यूचे थैमान पसरवून आता त्याची जबाबदारी झटकून टाकण्यासाठी जगात चुकीची माहिती पसरविण्याची मोहीमच चीनने सुरू केली आहे.

लडाख सीमारेषेवरील तणावपूर्ण परिस्थीतीवर भारताकडून स्पष्टीकरण

दरम्यान, अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे वादग्रस्त वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ''जगातील सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. ही भयानक 
बाब नसून अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. अमेरिकेत सर्वाधिक चाचण्या होत असल्याचा तो परिणाम आहे,'' असे ते म्हणाले. चाचण्या अधिक होत असल्याने रुग्णसंख्या मोठी दिसत असल्याचा ट्रम्प यांचा दावा असला तरी सुरवातीच्या काळातील निष्काळजीपणा आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे संसर्ग वेगाने पसरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

धक्कादायक : चीनच्या राजदूतांचा इस्त्रायलमध्ये संशयास्पद मृत्यू

निवडणुकीवर डोळा
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षीय निवडणूक होत असून त्यावर डोळा ठेवत ट्रम्प यांनी आक्रमक रूप धारण केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. चीन आणि राजकीय प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, बिडेन जिंकून यावेत आणि अमेरिकेला लुटण्याची संधी मिळावी, यासाठीच चीन जगभरात चुकीची माहिती पसरवीत आहे.

चिनी कंपन्यांना दाखविणार घरचा रस्ता 
वॉशिंग्टन - अमेरिकी शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या ८०० चीनी कंपन्यांची नोंदणी रद्द करून त्यांना अमेरिकेच्या शेअर बाजाराबाहेर काढण्यासंदर्भातील निर्णय अमेरिकी सिनेटने घेतला आहे. अमेरिकी सिनेटने एकमताने चीनी कंपन्यांची  शेअर बाजारातील नोंदणी रद्द करण्यासाठीचे विधेयक (बिल) मंजूर केले आहे. या निर्णयाचा मोठा दणका चीनी कंपन्यांना बसणार आहे. 

अमेरिकी शेअर बाजारात नोंदणी झालेल्या चीनी कंपन्यांमध्ये अमेरिकेतील मोठी गुंतवणूक होत असते. यामुळे अमेरिकेचा पैसा चीनी कंपन्यात गुंतवला जाऊन त्याचा लाभ चीनला होत असल्याची अमेरिकेची भूमिका आहे. ही गुंतवणूक अमेरिकेच्या मालकीच्या कंपन्यांमध्येच झाली पाहिजे अशी भूमिका अमेरिकेची आहे.

या विधेयकानुसार अमेरिकी शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांना महत्त्वाची माहिती अमेरिकेच्या सिनेटला द्यावी लागणार आहे. यातील पहिली अट म्हणजे अमेरिकेच्या शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांना त्यांची मालकी किंवा नियंत्रण परकी सरकारकडे आहे का?  याची माहिती द्यावी लागेल.

दुसरी महत्त्वाची अट म्हणजे अमेरिकी शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांना पब्लिक कंपनी अकाऊंटिंग ओव्हरसाईट बोर्डाच्या ऑडिटला सलग तीन वर्षे सामोरे जात त्यातील निकषांची पूर्तता करावी लागेल.

चिनी कंपन्यांना इतर कंपन्यांप्रमाणेच नियम लागू केले जावेत ही आमची भूमिका आहे. पारदर्शकतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत सिनेटर क्रिस वॅन हॉलेन यांनी व्यक्त केले. होल्डिंग फॉरेन कंपनीज अकाऊंटेबल अॅक्ट असे या विधेयकाचे नाव आहे. सर्वच पक्षाच्या सिनेटरने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. चिनी कंपन्यांमध्ये असलेल्या पारदर्शकतेच्या अभावामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे हित राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे हॉलेन यांनी म्हटले आहे. 

सध्या चीनमध्ये आणि हॉंगकॉंगमध्ये नोंदणी झालेल्या कंपन्यांवर पब्लिक कंपनी अकाऊंटिंग ओव्हरसाईट बोर्डाच्या ऑडिटचे बंधन नाही. 

महत्त्वाचे मुद्दे

  • होल्डिंग फॉरेन कंपनीज अकाऊंटेबल अॅक्ट बिल
  • अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे हित राखण्यासाठी हे पाऊल 
  • सर्वच पक्षाच्या सिनेटर्सचा या विधेयकासाठी पाठिंबा
  • अलीबाबासहित आघाडीच्या चीनी कंपन्यांना बसणार दणका
loading image