लडाख सीमारेषेवरील तणावपूर्ण परिस्थीतीवर भारताकडून स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मे 2020

भारत आणि चीन यांच्यातील उत्तर सिक्किम आणि लडाखजवळील वादग्रस्त भू-भागाच्या मुद्यावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही राष्ट्रांनी डेमचक, दौलत बेग ओल्डी, गलवान नदी आणि लडाखमधील परिसरातील संवेदनशील परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात केलाय.

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यामधील लडाखच्या सीमारेषेवरील तणावाच्या परिस्थितीसंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून गुरुवारी स्पष्टीकरण देण्यात आले. लडाखच्या सीमारेषेवर भारतीय लष्कराकडून कोणत्याही हालचाली सुरु नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारतीय लष्कर आपली हद्द सांभाळून असून चीनकडून कुरापती सुरु आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. सीमा रेषेवर गस्त घालणाऱ्या लष्करी जवानांसमोर चीनकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा उल्लेखही परराष्ट्र मत्रांलयाकडून करण्यात आलाय.  

धक्कादायक : चीनच्या राजदूतांचा इस्त्रायलमध्ये संशयास्पद मृत्यू

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार भारत आणि चीन यांच्यातील उत्तर सिक्किम आणि लडाखजवळील वादग्रस्त भू-भागाच्या मुद्यावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही राष्ट्रांनी डेमचक, दौलत बेग ओल्डी, गलवान नदी आणि लडाखमधील परिसरातील संवेदनशील परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात केलाय. जवळपास सहा दशकापासून गलवान परिसरातील काही भू-भागावरु दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरु आहे. 1962 मध्ये देखील या वादग्रस्त भू-खंडावरुन  दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्ष झाला होता. वादग्रस्त परिसरात दोन्ही राष्ट्रांच्या सैन्याकडून गस्त घातली जाते. चीनने गलवान खोऱ्यातील परिसरात अनेक टेंट (तंबू) उभारले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे भारतीय लष्कराकडून परिसरात डोळ्यात तेल घालून निगरानी सुरु असल्याचे समजते.  

चीन म्हणतंय लस नाही; पण हे औषध कोरोनावर करु शकते मात 

5 मे रोजी पेंगोंग तलाव परिसत भारत आणि चीन यांच्यातील जवळपास 250 सैन्यांमध्ये वाद झाला होता. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या दिशेने दगड फेक देखील करण्यात आली होती. यात दोन्ही राष्ट्रांच्या जवानांना दुखापत झाली होती. याशिवाय 9 मे रोजी सिक्किम सेक्टरमध्ये भारत-चीन यांच्यातील सैन्यामध्ये असाच प्रकार घडला होता. सीमारेषेवर शांती प्रस्थापित करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे, मात्र चीनकडून कुरापती सुरु असल्यामुळेच या घटना घडल्या आहेत, असे यापूर्वी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China hindering Indias normal patrol across the Line of Actual Control MEA