भूतानसोबत आमची सीमा निश्चिती झाली नाही; चीनची नवी आगळीक

कार्तिक पुजारी
Wednesday, 22 July 2020

चीनने भूतानच्या सकतेंग वाईल्ड लाईफ सेंचुरीवर आपला दावा सांगितला आहे. तसेच भूतानसोबत सीमा निश्चिती करणे अजून शिल्लक असल्याचं चीनने म्हटलं आहे

थिंपू- चीनने भूतानच्या सकतेंग वाईल्ड लाईफ सेंचुरीवर आपला दावा सांगितला आहे. तसेच भूतानसोबत सीमा निश्चिती करणे अजून शिल्लक असल्याचं चीनने म्हटलं आहे. चीनने सीमा वाद सोडवण्यासाठी भूतानला समाधान प्रस्ताव दिला आहे. मात्र, भूतानने चीनच्या दाव्याला पुन्हा एकदा फेटाळून लावले आहे.

'कोरोनाजन्य परिस्थितीत भारताची जमीन बळकावण्याचा चीनचा डाव'
चीनने भारतासोबत तणाव असताना भूतानसोबतही कुरापत काढली होती. ग्लोबल इन्वायरमेंट फॅसिलिटी काऊंसिलच्या ५८ व्या बैठकीत भूतानच्या सकतेंग वन्यजीव अभयारण्यावर चीनने दावा केला होता. तसेच याला होणाऱ्या मदतीला विरोध केला होता. चीनने हे अभयारण्य आपले असल्याचं म्हटलं आहे. शिवाय भूतानसोबत आमची सीमा निश्चिती झाली नाही, असं म्हणत चीनने वाद उकरुन काढला आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग वेनबिग यांनी यावर प्रतिक्रिया दिली. चीन नेहमीच याबाबत स्पष्ट राहिला आहे. आमची भूतानसोबत सीमा निश्चिती झाली नाही आणि मध्य, पूर्व तसेच पश्चिम भागात आपचा त्या देशासोबत वाद आहे. त्यामुळे चीन भूतानसोबत समाधान प्रस्ताव सादर करत आहे. चीन याला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवू इच्छित नाही, त्यामुळे संबंधित पक्षांशी आम्ही संपर्क साधून आहोत, असं ते म्हणाले आहेत.

कोविड 19 : IT कंपनीत काम करणाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय
भूतानने चीनच्या दाव्याला फेटाळून लावत साकतेंग वन्यजीव अभयारण्य देशाचा अभिन्न आणि सार्वभौम भाग असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या अभयारण्याला यापूर्वी कधीही आंतरराष्ट्रीय निधी मिळाला नव्हता. मात्र, जेव्हा पहिल्यांदा या अभयारण्याला पैसे देण्याचा विषय निघाला तेव्हा चीनने संधी साधत या प्रदेशावर आपला दावा सांगितला आहे. 
 
चीनच्या विरोधानंतरही साकतेंग वन्यजीव अभयारण्याला आतंरराष्ट्रीय मदत जाहीर झाली आहे. चीन आणि भूतानमध्ये कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. मात्र, दोन्ही देशांचे अधिकारी वेळोवेळी एकमेकांना भेटत आले आहेत. सीमा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत २४ वेळा चर्चा झाली आहे. मात्र, अजूनही वाद सुटू शकलेला नाही.

दरम्यान, चीनचे नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांशी सीमा वादावरुन संबंध ताणलेले राहिले आहेत. चीनने नुकतेच भारताच्या गलवान खोऱ्यावर आपला अधिकार सांगितला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध स्फोटक बनले आहेत. दोन्ही देशांचे सैनिक सीमा भागात मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. त्यातच चीनने आता भूतानच्या भूभागावर दावा सांगितला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China says border with Bhutan yet to be demarcated