चीनने घातली 'बुरखा, विचित्र पद्धतीच्या दाढी'वर बंदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

शिनजियांगमधील नव्या नियमावलीनुसार आता विमानतळ, रेल्वे स्थानके वा अन्य अशा सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यासहित सर्वांग झाकणारा पोषाख करणाऱ्या नागरिकांनी इतरांनी "समजावणे' आवश्‍यक असून; अशा नागरिकांची माहिती पोलिसांना देणेही बंधनकारक करण्यात आले आहे

बीजिंग - चीनमधील शिनजियांग प्रांतातील इस्लामी मूलतत्त्ववादाचा प्रभाव कमी करण्यासाठी येथील सरकारकडून विविध पाऊले उचलण्यात येत आहेत. यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये "विचित्र' पद्धतीने वाढविलेली दाढी वा सार्वजनिक ठिकाणी परिधान केला जाणारा बुरखा यांवर बंदी आणली जाणार आहे.

शिनजियांगमधील नव्या नियमावलीनुसार आता विमानतळ, रेल्वे स्थानके वा अन्य अशा सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यासहित सर्वांग झाकणारा पोषाख करणाऱ्या नागरिकांनी इतरांनी "समजावणे' आवश्‍यक असून; अशा नागरिकांची माहिती पोलिसांना देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. याचबरोबर, विवाह कायदेशीर पद्धतीने न करता धार्मिक पद्धतीने करणे, हलालच्या नावाखाली इतरांच्या धर्मनिरपेक्ष आयुष्यात दखल देणे, रेडिओ, टीव्ही वा अन्य सार्वजनिक सुविधा नाकारणे अशा बाबींवर बंदी घालण्यात आली आहे.

याचबरोबर, लहान मुलांनाही सर्वसामान्य शाळांत न घालता धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये घालण्यासही मनाई करण्यात आली आहे.

शिनजियांग या चीनच्या अतिवायव्येकडील भागामध्ये उघर मुस्लिमांची लोकसंख्या आहे. शिनजियांगमध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांत गेल्या काही वर्षांत शेकडो ठार झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, देशातील इस्लामी दहशतवादाचे संकट अधिक आव्हानात्मक होण्याचे भीती चिनी नेतृत्वास आहे. गेल्या महिन्यामध्येच इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने इराकमध्ये उघूर दहशतवादी "प्रशिक्षण' घेत असल्याचे चित्रीकरण प्रसिद्ध केले होते. या पार्श्‍वभूमीवर, दहशतवादाचा धोका हा अपेक्षेपेक्षा कितीतरी गंभीर असल्याचे मानले जात आहे.

चीनमधील धार्मिक व वांशिक अल्पसंख्यांकांचे "चिनीकरण' केले जावे, असे मत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केले आहे. परंतु, हे आव्हान अत्यंत जटिल असल्याचे स्पष्ट आहे.

Web Title: China sets rules on beards, veils to combat extremism in Xinjiang