चीनची क्षेपणास्त्र चाचणी; संपूर्ण भारत आणि अमेरिकेचं नौदल तळही होऊ शकतं टार्गेट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

चीनने अणु हल्ला करू शकेल अशा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. चीनच्या आर्मी रॉकेट फोर्सने नुकतंच युद्धाभ्यासावेळी डीएफ 26 आणि डीएफ 16 क्षेपणास्त्रांची चाचणी केली.

बिजिंग - भारतासह अमेरिका आणि इतर अनेक देशांसोबत सध्या चीनचे तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत चीन आशियामध्ये युद्ध भडकवण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. चीनने अणु हल्ला करू शकेल अशा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. चीनच्या आर्मी रॉकेट फोर्सने नुकतंच युद्धाभ्यासावेळी डीएफ 26 आणि डीएफ 16 क्षेपणास्त्रांची चाचणी केली. ही चाचणी केव्हा आणि कुठे झाली याची माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. 

चीनच्या डीएफ 26 क्षेपणास्त्रामध्ये अणु हल्ला करण्याची ताकद आहे. या क्षेपणास्त्राची रेंज 4 हजार किलोमीटरपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. यानुसार संपूर्ण भारतासह प्रशांत महासागरात असलेल्या अमेरिकेचं गुआम हे नौदल तळही क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये येतं. चीनच्या सैन्यात हे मिसाइल 2016 मध्ये दाखल झालं होतं. डीएफ 26 मिसाइट 1200 ते 1800 किलोग्रॅमपर्यंत न्यूक्लिअर वॉरहेड वाहून नेऊ शकतं. 

चीनचं दुसरं मिसाइल डीएफ 16 त्याच्या आधीच्या मिसाइलचं सुधारीत रूप आहे. या शॉर्ट रेंजच्या बॅलेस्टिकची रेंज 800 ते 1000 किलोमीटरपर्यंत आहे. हे मिसाइल अणु हल्ल्यासह इतर हल्ले करण्यासाठी सक्षम आहे. वजनाने हलकं असल्यानं चीनी सैन्य हे सहजपणे ट्रकवर लादून देशाच्या कोणत्याही भागात नेता येतं. 

हे वाचा - राहुल गांधींच्या टीकेनंतर मोदी सरकारने वेबसाइटवरून कागदपत्रे केली डिलीट

चीनी सेनेच्या अधिकृत वेबसाइट 81.cn च्या रिपोर्टनुसार, चीनी रॉकेट फोर्स ब्रिगेडचे कमांडर लियु यांग यांनी सांगितलं की आम्ही युद्धजन्य परिस्थिती पाहता हाय अलर्टवर आहे. येत्या काळात अणु हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि अचूक कारवाई करण्यासाठी अभ्यास सुरू आहे.

याआधीही जानेवारीमध्ये चीनने अणु हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्याच्या पद्धतींची चाचणी घेतली होती. त्यावेळी अज्ञात ठिकाणी अंडरग्राउंड स्टेशनवरून एक मिसाइल डागण्यात आलं होतं. कोरोना व्हायरस जगभर पसरल्यानंतर अनेक देशांनी चीनवर थेट आरोप केले आहेत. त्यानंतर बऱ्याच देशांसोबत चीनचे संबंध बिघडले आहेत. 

हे वाचा - Bairut Blast : भारतातही बैरूतसारख्या स्फोटाचा धोका

चीनचा सरकारी रेडिओ चायना नॅशनलने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, दक्षिण थिएटर कमांडने दोन बॉम्ब हल्ला करणाऱ्या विमानांना दिवसा आणि रात्री युद्धाच्या अभ्यासासाठी अज्ञात स्थळी पाठवलं आहे. गेल्या महिन्यात संरक्षण मंत्रालयाने म्हटलं होतं की, दक्षिण चीन समुद्रात दूरपर्यंत टार्गेट करता येईल अशा बॉम्बची चाचणी घेण्याती आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china test ballestic missile range over 4000 km