देशातील अमेरिकी नागरिकांना डांबून ठेवू; चीनचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 October 2020

चीनच्या संशोधकांवरील कारवाई थांबविली नाही तर आमच्या देशात असलेल्या तुमच्या नागरिकांना डांबून ठेवू असा इशारा चीनने अमेरिकेला काही महिन्यांपूर्वीच दिल्याचे वृत्त आहे.

बीजिंग- चीनच्या संशोधकांवरील कारवाई थांबविली नाही तर आमच्या देशात असलेल्या तुमच्या नागरिकांना डांबून ठेवू असा इशारा चीनने अमेरिकेला काही महिन्यांपूर्वीच दिल्याचे वृत्त आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने हे वृत्त दिले आहे. कोरोनाची साथ जगात पसरल्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला. त्यानंतर ह्युस्टन आणि चेंगडू येथील एकमेकांच्या राजनैतिक वकिलाती बंद करण्याचे पाऊल उभय देशांनी उचलले.

बीजिंगमधील अमेरिकी वकालातीच्या माध्यमातून चिनी अधिकाऱ्यांनी हा इशारा वारंवार देण्यात आला. अनेक चिनी संशोधक अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये संशोधन करीत आहेत. त्यांचे चिनी लष्कराशी गुप्त संबंध असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. या वृत्तपत्राने संपर्क साधला असता परराष्ट्र खात्यातर्फे तपशील देण्यास नकार दर्शविण्यात आला. वॉशिंग्टनमधील चिनी दुतावासानेही भाष्य केले नाही.

तैवान बळकावण्याची चीनची तयारी?; आग्नेय किनाऱ्यालगत लष्कर सक्रिय

चीनची मनमानी कारवाई

न्याय खात्याच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्रमुख जॉन डेमर्स यांचा हवाला वॉल स्ट्रीट जर्नलने दिला आहे. कायदेशीर कारवाईला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिका, कॅनडाचे नागरिक तसेच इतर काही व्यक्तींना कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय मनमानी पद्धतीने डांबून ठेवले आहे. तसे प्रकार घडल्याची आम्हाला माहिती आहे, असे डेमर्स यांनी म्हटले आहे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china threaten america that citizens will be locked in country