तैवानवरुन चीनने ट्रम्पना पुन्हा ठणकावले

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

एक चीन धोरणासहित सर्व विषयांवर "चर्चा' होऊ शकेल, असे सूचक विधान ट्रम्प यांनी या मुलाखतीदरम्यान केले होते. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचा एक चीन धोरणास असलेला पाठिंबा हाच चीन-अमेरिका मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया असल्याचा इशारा चीनकडून पुन्हा एकदा देण्यात आला आहे

बीजिंग - चीनच्या तैवानविषयक धोरणामध्ये तिळमात्र बदल होणार नाही, असा इशारा चीनकडून अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला आहे.

अमेरिकेस चीनकडून विविध संवेदनशील मुद्यांवर अपेक्षित सहकार्य केले जात नसताना अमेरिकेने एक चीन धोरण कायम का ठेवावे, असा प्रश्‍न ट्रम्प यांनी उपस्थित केला होता. ट्रम्प यांच्या भूमिकेने चीनकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होतीचच. याशिवाय ट्रम्प यांच्याकडून गेली काही दशके अमेरिकेकडून चीनसंदर्भात राबविण्यात आलेल्या सातत्यपूर्ण धोरणाविरोधी सूरही व्यक्त करण्यात आला होता. "वॉल स्ट्रीट जर्नल'ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी हीच भूमिका पुन्हा एकदा ध्वनित केली. एक चीन धोरणासहित सर्व विषयांवर "चर्चा' होऊ शकेल, असे सूचक विधान ट्रम्प यांनी या मुलाखतीदरम्यान केले होते. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचा एक चीन धोरणास असलेला पाठिंबा हाच चीन-अमेरिका मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया असल्याचा इशारा चीनकडून पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

ट्रम्प यांनी  तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केल्याने चीनकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. गेल्या काही दशकांत अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने तैवानच्या नेत्याशी चर्चा केलेली नाही. किंबहुना, चीनमध्ये दूतावास सुरु करण्यासाठी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना 1979 मध्ये तैवानशी असलेले राजनैतिक संबंध तोडून टाकावे लागले होते. तेव्हापासून "एक चीन' तत्त्वास अमेरिकेने दिलेली मान्यता हा अमेरिका-चीन संबंधाचा पाया ठरला आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मांडलेली ही नवी भूमिका राजनैतिकदृष्टया अत्यंत संवेदनशील ठरु शकते.

Web Title: China warns Trump on Taiwan issue