मोदींच्या विधानाचे चीनकडून स्वागत

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

नव्या परिस्थितीमध्ये अणु पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताचा सहभाग अधिक अवघड बनला असून त्यांना अद्यापही आमचा पाठिंबा नाही, असे चीनने आज स्पष्ट केले. गेल्या पंधरा दिवसांमध्ये चीनने हे तिसऱ्यांदा सांगितले आहे

बीजिंग - भारत-चीन सीमा वाद सुरू असला तरी गेल्या चाळीस वर्षांत या सीमेवर एकही गोळी झाडली गेली नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचे चीनने आज स्वागत केले. रशिया दौऱ्यावेळी मोदी यांनी हे विधान केले होते.

मोदी यांच्या या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या की, दोन्ही देशांचे नेते सीमावाद चर्चेच्या माध्यमातूनच सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मोदींनीही आपली भूमिका स्पष्ट केल्याने आणि ती योग्य असल्याने आम्ही त्याचे स्वागत करतो. सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी चीन कायम प्रयत्नशील आहे. द्वीपक्षीय संबंध सुधारत गेल्यास दोन्ही देशांचा फायदा आहे.

"एनएसजी'बाबत चीनची नकारघंटा कायम
नव्या परिस्थितीमध्ये अणु पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताचा सहभाग अधिक अवघड बनला असून त्यांना अद्यापही आमचा पाठिंबा नाही, असे चीनने आज स्पष्ट केले. गेल्या पंधरा दिवसांमध्ये चीनने हे तिसऱ्यांदा सांगितले आहे. भारताने अण्वस्त्र बंदी करारावर सही केली नसल्याने या गटात त्यांना प्रवेश देता येणार नाही, अशी चीनची भूमिका आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स दौऱ्यामध्ये सर्व देशांनी "एनएसजी'मधील भारताच्या प्रवेशाला असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केल्यानंतर चीनने आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे समजते. मात्र, "नवी परिस्थिती' म्हणजे काय, हे सांगण्यास चीनच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.

Web Title: China welcomes statement by Modi