चीन उभारणार चांद्रस्थानक; जगातील पहिला प्रयोग दहा वर्षांत प्रत्यक्षात 

चीन उभारणार चांद्रस्थानक; जगातील पहिला प्रयोग दहा वर्षांत प्रत्यक्षात 

बीजिंग (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर अवकाश यान पाठवून चीनने विक्रम केला आहे. आता चंद्रावर मानवाला पाठवून पुढील दहा वर्षांत तेथे चांद्रस्थानक उभारण्याचा विचार चीन करीत आहे, अशी माहिती येथील "झिन्हुआ' या सरकारी वृत्तसंस्थेने बुधवारी अवकाशशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांचा हवाला देत दिली आहे. 

अवकाशातील महासत्ता बनण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागात यान पाठवून त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. जानेवारीत हे यान चंद्राच्या दुसऱ्या भागात यान उतरविणारा चीन हा जगातील पहिला देश बनला आहे. आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर येत्या दहा वर्षांत वैज्ञानिक संशोधन स्थानक उभारणाचे नियोजन चीनने केले आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय अवकाश प्रशासनाचे प्रमुख झॅंक केजियान यांनी दिली असल्याचे "झिन्हुआ'ने म्हटले आहे. अवकाश दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

झॅंक म्हणाले की, 2020 पर्यंत चीन मंगळ मोहीम हाती घेणार असून, या वर्षाच्या अखेरिस "चॅंग-ई 5' ही चौथी चांद्र मोहीम प्रत्यक्षात येईल. "लॉंग मार्च 5 बी' हे रॉकेट 2020 च्या पूर्वार्धात प्रथमच चंद्राकडे झेपावेल. यात नियोजित अवकाश स्थानकाचे महत्त्वाचे भाग पाठविण्यात येणार आहेत. 

अब्जावधी डॉलरची तरतूद 
देशातील नागरी व लष्करी अवकाश कार्यक्रमासाठी चीन सध्या रशिया व जपानपेक्षा जास्त निधी खर्च करीत आहे. याबाबत जगात अमेरिकेनंतर चीनचा दुसरा क्रमांक आहे. आर्थिक सहकार्य व विकास परिषदेच्या अहवालानुसार 2017च्या अर्थसंकल्पात चीनने अवकाश कार्यक्रमासाठी 8.4 अब्ज डॉलर एवढी तरतूद केली होती. 

चीनची अवकाश भरारी... 
- चंद्रावर मानवी मोहीम 
- चांद्रस्थानकाची प्रथमच उभारणी 
- अमेरिका, रशिया, कॅनडा, युरोप व जपानच्या सहकार्याने नवीन अवकाश स्थानक उभारणार 
- लघुग्रह संशोधन मोहीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com