कोरोनाविरुद्ध चीन-जागतिक आरोग्य संघटना एकत्र

वृत्तसंस्था
Wednesday, 5 August 2020

जगभरातील कोरोनाची साथ अधिक प्रभावीरीत्या नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना विषाणूचा प्राण्यांमधील संभाव्य स्रोत, त्यानंतरची माध्यमे व विषाणूच्या प्रसाराच्या मार्गांवरही दोन्ही बाजूंनी बोलणी करण्यात आली. 

बीजिंग - अवघ्या जगाला त्रस्त करणाऱ्या कोरोना विषाणूचा नेमका उगम शोधण्यासाठी चीन आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) एकत्र आले आहेत. याबाबतच्या आराखड्यावर चीन आणि  परस्परांत चर्चा करत आहेत. डब्लूएचओच्या दोन तज्ज्ञांनी चीनला नुकतीच  भेट दिली. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, या तज्ज्ञांनी चीनमधील आपल्या दोन आठवड्यांच्या वास्तव्यात कोव्हिड-१९ विषाणूचा उगम शोधण्यासाठी वैज्ञानिक संशोधन व सहकार्य करण्यावर चीनशी प्राथमिक चर्चा केली. या चर्चेत लोकसंख्या, पर्यावरण, कोरोनाचा रेणू, प्रसाराचे विविध मार्ग आदी विषयांचा समावेश होता. त्याचप्रमाणे,वैज्ञानिक संशोधनाच्या आराखड्यावरही चर्चा करण्यात आली. जगभरातील कोरोनाची साथ अधिक प्रभावीरीत्या नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना विषाणूचा प्राण्यांमधील संभाव्य स्रोत, त्यानंतरची माध्यमे व विषाणूच्या प्रसाराच्या मार्गांवरही दोन्ही बाजूंनी बोलणी करण्यात आली. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते पुढे म्हणाले की, डब्लूएचओच्या नियंत्रणाखालील वर्ल्ड हेल्थ ॲसेंब्लीने पारित केलेल्या ठरावानुसार कोरोना विषाणूचा जागतिक मागोवा घेण्यात चीनच्या योगदानावरही  यावेळी चर्चा झाली.

राम मंदिर भूमीपूजन : लालकृष्ण अडवानी यांची भावनिक प्रतिक्रिया

चीनची सावध भूमिका
गेल्या वर्षी चीनमधील वुहान शहरात कोव्हिड - १९ हा विषाणू सर्वप्रथम आढळला होता. त्याचे धागेदोरे वन्य प्राण्यांची विक्री होणाऱ्या फळ बाजारापर्यंत गेले. हा विषाणू वटवाघळामधून मुंग्या खाणाऱ्या खवले मांजरासारख्या प्राण्यातून मनुष्यात संक्रमित झाला असावा, अशी शक्यता वैज्ञानिकांनी वर्तविली होती. तथापि, साथ पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत पूर्ण तपासासाठी वाट पाहावी लागेल, असे स्पष्ट करून चीनने जागतिक आरोग्य संघटनेला माहिती उशिरा दिल्याचा आरोपही चीनने फेटाळला होता. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी चीनबरोबर कोरोना विषाणूचा उगम शोधण्याच्या संभाव्य आराखड्यावर चर्चा केली. कोरोनाची जगभरातील साथ नियंत्रणात आणण्यासाठी उभयंतात बोलणी करण्यात आली.
- वांग वेनबिन, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते  

काय शोधणार 
कोरोना विषाणूचा प्राण्यांमधील संभाव्य स्रोत 
त्यानंतरची इतर माध्यमे 
विषाणूच्या प्रसाराचे विविध मार्ग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China-World Health Organization together Against Corona