चिनी कंपन्यांचे वागणे ईस्ट इंडिया कंपनीसारखे; अमेरिकेचा पुन्हा हल्लाबोल

कार्तिक पुजारी
बुधवार, 15 जुलै 2020

दुसऱ्या देशात काम करणाऱ्या चिनी कंपन्या म्हणजे आताच्या काळातील ईस्ट इंडिया कंपन्या आहेत, असं म्हणत अमेरिकेच्या राज्य विभागाने चीनला धारेवर धरले.

वॉशिंग्टन- पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांसोबत संघर्ष केलेल्या चीनला अमेरिकेने चांगलेच सुनावले आहे. दुसऱ्या देशात काम करणाऱ्या चिनी कंपन्या म्हणजे आताच्या काळातील ईस्ट इंडिया कंपन्या आहेत, असं म्हणत अमेरिकेच्या राज्य विभागाने चीनला धारेवर धरले. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या हालचालींवर भारतासह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

पक्षाचे दरवाजे तुमच्यासाठी अजूनही खुले; काँग्रेसने दिली परतीची साद
दक्षिण चीन समुद्राच्या मुद्द्यावरुन आर्कटिक, हिंद महासागर, मेडिटेरियन आणि अन्य जलमार्गांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. चीनने समुद्र भागात डिवचणे आणि धमकावण्याच्या प्रकार वाढवला आहे. हिमालयातही चीनने भारतासोबत सीमा भागात आक्रमकता दाखवली आहे, असंही अमेरिकेच्या राज्य विभागाने म्हटलं आहे.

चीनने दक्षिण चीन समुद्रात आपली दादागिरी वाढवली आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, फ्रांस, जर्मनी आणि भारताने चीनच्या या हालचालींवर आक्षेप घेतला आहे. चीनची कृती क्षेत्रीय शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांसाठी धोक्याची ठरु शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियापासून भारत आणि जपानपर्यंत सर्व भागीदारांमध्ये नवे सुरक्षा करार आकाराला येत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी चीन भारताविरोधात आक्रमक होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच दक्षिण चीन समुद्र आणि हाँगकाँगमध्ये चीनने उचललेल्या पाऊलांमुळे सत्तारुढ 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना' कोणत्या प्रकारचे विचार बाळगते हे दिसून येतं. भारत आणि चीनमध्ये जे वाद झाले ती त्यांची अंतर्गत बाब आहे. पण चीनने भारती सैनिकांची हत्या करुन आपला खरा चेहरा दाखवला आहे, असं ते म्हणाले आहेत.

भारत आणि अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही दिला चीनला दणका
दरम्यान, ब्रिटनने अमेरिकेच्या दबावापुढे झुकत आणि चीनकडून देण्यात येणाऱ्या इशाऱ्याला दुर्लक्षित करत आपल्या 5 जी नेटवर्कमधून चीनची मोठी कंपनी हुआवेईला (Huawei) बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनविरोधात आंतरराष्ट्रीय असंतोष वाढताना दिसत आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि ब्रिटननेही चीन विरोधी भूमिका घ्यालया सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनसमोरील अडचणी वाढत असून चीन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese companies behave like East India companies said america