"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

सिंगापूर हा "आसियान' देशांमधील भारताचा सर्वांत जवळचा मित्रदेश मानला जातो. भारत व सिंगापूरमध्ये नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या "व्यूहात्मक भागीदारी करारा'चा उलेखही या व्हिडिओमध्ये करण्यात आला असून, सिंगापूरमधील चिनी भाषेतील वृत्तपत्रांमध्येही सिंगापूरच्या भारतविषयक धोरणांवर टीका करणारे लेख प्रकाशित झाले आहेत

नवी दिल्ली - भारत व सिंगापूर या दोन देशांच्या नौदलांनी गेल्या महिन्यामध्ये दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रामध्ये केलेल्या संयुक्त सरावानंतर सिंगापूरमधील चिनी वंशाच्या नागरिकांच्या माध्यमामधून सिंगापूर सरकारवर टीका करणारे व्हिडिओ पसरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

"चीनऐवजी अमेरिका व भारताबरोबर दृढ संबंध ठेवणारा सिंगापूर हा पिवळी कातडी व काळे हृदय असलेल्या लोकांचा देश,'' असल्याची टीका या व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे. हे व्हिडिओ अर्थातच चिनी भाषेमधील आहेत.

"सिंगापूर हा बलिष्ठ देश नसला; तरी अमेरिका व भारताच्या सहाय्यामुळे हा देश दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रामध्ये चीनचे "नुकसान' करु शकतो. मुख्यत: दक्षिण चिनी समुद्रामधून होणाऱ्या चीनच्या आयात व निर्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो,'' अशी भीती या व्हिडिओमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर या व्हिडिओच्या माध्यमामधून सिंगापूरवर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे.
भारत व सिंगापूर या दोन देशांमधील राजनैतिक संबंधांस अर्धशतक पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ या दोन देशांच्या नौदलांनी संयुक्त लष्करी सराव केला होता.

सिंगापूर हा "आसियान' देशांमधील भारताचा सर्वांत जवळचा मित्रदेश मानला जातो. भारत व सिंगापूरमध्ये नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या "व्यूहात्मक भागीदारी करारा'चा उलेखही या व्हिडिओमध्ये करण्यात आला असून, सिंगापूरमधील चिनी भाषेतील वृत्तपत्रांमध्येही सिंगापूरच्या भारतविषयक धोरणांवर टीका करणारे लेख प्रकाशित झाले आहेत.

सिंगापूरमधील युनायटेड ग्रुप या संघटनेकडून या व्हिडिओंचा अनौपचारिकरित्या प्रचार (प्रपोगॅंडा) करण्यात येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सिंगापूरवर जास्तीत जास्त दबाव आणण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आले आहे. हे व्हिडिओअदेखील याच अस्वस्थ चिनी धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Chinese videos slam India-Singapore exercise