
नागरिक सुरक्षित, सैनिक अद्याप अडकलेलेच
झॅपोरिझ्झिया - युक्रेनच्या पूर्व भागात असलेल्या मारिउपोल शहरातील पोलाद प्रकल्पात अडकून पडलेले सर्व नागरिक सुरक्षित बाहेर पडल्याचे आज सूत्रांनी सांगितले. तसेच, शहरातील इतर भागातील नागरिकही स्थलांतरीत होत आहेत. मात्र, पोलाद प्रकल्पातील भुयारांमध्ये लपून बसलेले युक्रेनचे सैनिक मात्र अद्यापही अडकलेलेच असून त्यांना बाहेर जाऊ देण्यास रशिया तयार नाही. दोन महिन्यांहून अधिक काळ वेढा दिल्यानंतर मारिउपोल शहराचा बहुतांश भाग रशियाच्या ताब्यात आला आहे. मात्र, अद्यापही येथील पोलाद प्रकल्पातील सैनिकांकडून प्रतिकार होत आहे. रशियाने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ९ मे या तारखेला नाझी जर्मनीवर विजय मिळविला होता. तो दिवस रशियात ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी, म्हणजे उद्यापर्यंतच (ता. ९) मारिउपोलचा संपूर्ण ताबा मिळविण्याची रशियाची इच्छा असली तरी युक्रेनी सैनिकांमध्ये ती अद्याप पूर्ण झालेली नाही. शरणागती पत्करा, तरच सोडून देतो, असा इशारा या सैनिकांना रशियाने दिला आहे. युक्रेनच्या दक्षिण भागात मात्र रशियाचे तीव्र हल्ले सुरुच आहेत.
हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू
युक्रेनमध्ये लुहान्स्क प्रांतात आज रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात एका शाळेत आश्रय घेतलेल्या किमान साठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाच्या विमानातून पडलेल्या बाँबमुळे ही शाळा उद्ध्वस्त झाली असून ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या ३० जणांना वाचविण्यात आले आहे. दोन मृतदेह हाती लागले असून अद्याप अनेक जण ढिगाऱ्यांखाली असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या शाळेत ९० जणांनी आश्रय घेतला होता.
बेटाचा ताबा पुन्हा युक्रेनकडे
युद्धाच्या सुरुवातीलाच रशियाने काळ्या समुद्रातील युक्रेनच्या बेटावर ताबा मिळविला होता. युक्रेनच्या सैनिकांनी अनपेक्षितपणे जोरदार प्रतिहल्ला करत या बेटावर पुन्हा आपले नियंत्रण मिळविले आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर असलेल्या खारकिव्हमध्येही युक्रेनचे सैनिक रशियाच्या फौजांना मागे ढकलत आहेत. युक्रेनी सैनिकांना थोपविण्यासाठी रशियाने शहराच्या ईशान्य भागातील तीन पूल पाडून टाकल्याचा दावा ब्रिटनने केला आहे.
Web Title: Citizens Are Safe Soldiers Are Still Trapped Situation City Of Mariupol
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..