घरी बसावे लागणाऱ्या ‘पॉझिटिव्ह’ व्यक्तींना मिळणार भरपाई

यूएनआय
Saturday, 23 January 2021

कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास घरी बसावे लागण्याने आर्थिक नुकसान होण्याची लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी त्यांना विशिष्ट रक्कम भरपाई म्हणून देण्याचा विचार ब्रिटनचे सरकार करीत आहे. यासाठी महिन्याला दोन अब्ज पौंड इतकी तरतूद करावी लागेल. तसे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

लंडन - कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास घरी बसावे लागण्याने आर्थिक नुकसान होण्याची लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी त्यांना विशिष्ट रक्कम भरपाई म्हणून देण्याचा विचार ब्रिटनचे सरकार करीत आहे. यासाठी महिन्याला दोन अब्ज पौंड इतकी तरतूद करावी लागेल. तसे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

गार्डीयन या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे, ज्यास या घडामोडींची कल्पना असलेल्या एका व्यक्तीने दुजोरा दिला आहे. या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने मिळविलेल्या कागदपत्रांवरील तारीख १९ जानेवारीची आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, पण धोरणाच्या मसुद्यानुसार ५०० पौंड इतकी रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. सध्या क्वारंटाईनची सूचना मिळाल्यास केवळ किमान उत्पन्न असलेल्या वर्गातील लोकांनाच ही सवलत दिली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासंदर्भात पर्यावरण सचिव जॉर्ज यूस्टीस यांनी सांगितले की, सध्या ही शक्यता आहे, पण अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

युरोपमध्ये ब्रिटनमधील कोरोना बळींची संख्या सर्वाधिक आहे. सध्या तेथे तिसरे राष्ट्रीय लॉकडाऊन सुरु आहे. तेथील मृतांचा ताजा आकडा ९४ हजार ५८० इतका आहे. संसर्ग झाल्यानंतर २८ दिवसांच्या आत हे बळी गेले आहेत.
या कागदपत्रांनुसार विलगीकरण टाळावे म्हणून चाचणी करून घेण्यास अनेकांची तयारी नाही. चाचणीसाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण केवळ १७ टक्के आहे. स्वयंविलगीकरणाच्या नियमांचे पालन करणाऱ्यांचे प्रमाण केवळ २५ टक्के, तर नेहमीप्रमाणे कामावर जाणाऱ्यांचे प्रमाण अजूनही १५ टक्के इतके आहे.

स्वदेशी कोव्हॅक्सिनने पास केली महत्त्वाची 'परीक्षा'; घाबरण्याचं कारण नाही

आणखी दंड
दरम्यान, घरामधील पार्टीला कुणी उपस्थित राहिल्यास ८०० पौंड दंड करण्याचा नवा नियम गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे.

मंदीचा धोका
दुकाने, हॉटेल आणि शाळा अजूनही बंद असून अगदीच आवश्यक असेल तरच लोकांनी बाहेर पडावे असा आदेश आहे. या निर्बंधांमुळे आर्थिक मंदी आणखी तीव्र होण्याचा धोका आहे. तीन शतकांमधील सर्वांत तीव्र मंदीची आत्ताच नोंद झाली आहे.

बंदिस्त जागेत अधिक काळ बोलणे टाळा!

सहकार्यास नकारामुळेच...
कोरोना चाचणी करून घेण्यास किंवा लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्यास नकार देणाऱ्यांचे प्रमाण बरेच वाढते आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी सरकारमधील काही अधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कुणा व्यक्तीच्या सहवासात आलेल्या लोकांनी स्वयंविलगीकरण करण्याचे प्रमाण वाढावे आणि पर्यायाने कोरोना नियमांच्या पालनाची टक्केवारी वाढण्याची गरज आम्हाला वाटते. याशिवाय संसर्गाची लक्षणे असल्यास लोकांनी चाचणी करणेही गरजेचे आहे.
- जॉर्ज युस्टीस, ब्रिटनचे पर्यावरण सचिव

१५ फेब्रुवारीचे उद्दिष्ट
संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या एक कोटी ५० लाख लोकांचे लसीकरण १५ फेब्रुवारीपर्यंत करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ठेवले आहे. ते पूर्ण होताच लॉकडाउनचे नियम शिथिल करावेत असे दडपण त्यांच्या उदारमतवादी पक्षाचे  सदस्यच आणत आहेत. यानंतरही उन्हाळ्यापर्यंत लॉकडाउन राहू शकेल असे संकेत जॉन्सन यांनी दिले आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Compensation given positive people stay at home