
भारतात कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत.
नवी दिल्ली - भारतात कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. दरम्यान, स्वदेशी भारत बायोटेकच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु असल्याने अनेकांनी ही लस टोचून घेण्यास नकार दिला. यापार्श्वभूमीवर आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कोव्हॅक्सिनची पहिल्या टप्प्यातील चाचणी जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल लँसेटने प्रभावी ठरल्याचं म्हटलं आहे.
कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. त्याचा डेटा आलेला नसल्यानं वापराबाबत थोडी भीती लोकांच्या मनात आहे. तर दुसरीकडे डीजीसीआयने वापर करण्यासाठी मंजुरी दिल्याने लसीकरण मोहिमेत ही लससुद्दा दिली जात आहे. कोव्हॅक्सिन लस भारत बायोटेकने आयसीएमआर आणि नॅशनल व्हायरॉलॉजी पुणे यांच्या सहकार्याने तयार केली आहे.
हे वाचा - 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूमधून वाचली; आता आजीने कोरोनाची घेतली लस
लँन्सेटने या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीचे रिझल्ट प्रकाशित केले आहेत. यामध्ये चांगली प्रतिकारक्षमता तयार झाल्याचं आणि कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही असं म्हटलं आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या रिपोर्टचा अभ्यास सुरु आहे. तर भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेतील जात आहे.
ऑक्सफर्डची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सना दिली जात आहे. कोणत्याही व्हॅक्सिनची पहिल्या दोन टप्प्यात मानवी चाचणी घेताना सुरक्षेवर लक्ष दिलं जातं. तर तिसऱ्या टप्प्यात लसीच्या प्रभावावर लक्ष देण्यात येतं. .
हे वाचा - जुन्या 100 रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? वाचा आरबीआयने काय म्हटलंय
कोव्हॅक्सिन इनअॅक्टिव्हेटेड कोरोना व्हायरससाठी तयार करण्यात आली आहे. या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर अनेक आरोग्य तज्ज्ञांनी आणि संस्थांनी प्रश्न उपस्थित केला. कोव्हॅक्सिनचे कोडनेम BBV152 असं आहे. लँसेटच्या संशोधन अहवालात म्हटलं आहे की, चाचणीवेळी ज्यांना लस देण्यात आली आहे त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. डिसेंबर महिन्यात आणखी एका मेडिकल जर्नलने असंच म्हटलं होतं. मात्र त्यावेळी कोव्हॅक्सिनचा डेटा पब्लिश करण्यात आलेला नव्हता.