पर्सनल कॉम्प्युटरचा जनक अरनॉल्ड स्पिलबर्ग यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

बालपणासूनच गॅझेटने वेढलेल्या अरनॉल्ड यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी स्वत:चा क्रिस्टल रेडिओ आणि 15 व्या वर्षी रेडिओ बनविला होता. 

लॉस ऐंजल्स - विख्यात हॉलीवूड दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांचे वडील, कल्पक अभियंते आणि पर्सनल काम्प्युटरचे जनक अरनॉल्ड स्पिलबर्ग (वय 103) यांचे गुरूवारी वृद्धत्वामुळे निधन झाले. कुटुंबाच्या गराड्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या चार मुलांनी एका निवेदनाद्वारे दिली. त्यांच्या मागे या चार मुलांसह तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मुलींमध्ये पटकथा लेखक ॲन स्पिलबर्ग, निर्मात्या नॅन्सी स्पिलबर्ग आणि विपणन अधिकारी सुई स्पिलबर्ग यांचा समावेश आहे. 

अमेरिकेतील सिनसिनाटी येथे 1997 मध्ये युक्रेन-ज्यू स्थलांतरित दांपत्याच्या पोटी अरनॉल्ड यांचा जन्म झाला. बालपणासूनच गॅझेटने वेढलेल्या अरनॉल्ड यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी स्वत:चा क्रिस्टल रेडिओ आणि 15 व्या वर्षी रेडिओ बनविला. त्यानंतर कौशल्य विकसित करत त्यांनी दुसऱ्या महायुध्दादरम्यान रेडिओ चालक व 490 व्या बॉम्ब तुकडीचा संवादप्रमुख म्हणूनही काम केले. सिनसिनाटी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ‘आरसीए’ साठी संगणक संशोधन सुरू केले. तेथेच त्यांनी पहिल्या संगणकीकृत रोख रक्कमेच्या नोंदणीत योगदान दिले. अरनॉल्ड यांनी मुलगा स्टिव्हन स्पिलबर्गकडून निधी दिल्या जाणाऱ्या ‘युएससी शोआह फाउंडेशन’ने वापरलेले तंत्रज्ञान संग्रहित केले. 

हे वाचा - ख्राइस्टचर्च हल्लेखोराला मरेपर्यंत तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही अशी शिक्षा

स्टिव्हन यांच्या पहिल्या चित्रपटसाठी मदत 
वडिलांनी मला त्यांचा संगणकाने कसे काम करण्याची अपेक्षा होती, हे स्पष्ट केले. परंतु, त्याकाळतील ही संगणकशास्त्राची भाषा मला ग्रीकसारखी वाटली. हे सर्व खूप रोमांचित करणारे पण माझ्या आकलनापलीकडचे होते. काही काळानंतर ते मला समजले, अशी प्रतिक्रिया स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी जनरल इलेक्ट्रिकच्या ‘जीई’ रिपोर्टसला 2016 मध्ये दिली होती. अरनॉल्ड यांना आपल्या मुलाला आपल्याप्रमाणे अभियंता बनवायचे होते. मात्र, स्टिव्हन यांच्या चित्रपटप्रेमामुळे ते सुरवातीला निराश झाले होते. त्यानंतर, त्यांचे चित्रपट पाहून मात्र ते खूश झाले होते. त्यांनी स्टिव्हन यांना ‘फायरलाईट’ हा पहिला चित्रपट बनविण्यासही मदत केली. 

असा झाला पर्सनल कॉम्प्युटरचा जन्म 
जनरल इलेक्ट्रिकसाठी काम करताना अरनॉल्ड स्पिलबर्ग आणि चार्लस प्रॉपस्टर यांनी 1950 मध्ये ‘जीई-225’ हा मेनफ्रेम संगणकाचा आराखडा तयार केला. त्यामुळे डार्टमाउथ महाविद्यालयातील वैज्ञानिकांना बेसिक प्रोग्रॅमिंग भाषा विकसित करता आली. त्यातूनच 1970 आणि 1980च्या दशकात पर्सनल कॉम्प्युटरचा जन्म झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Computer pioneer Arnold Spielberg dies at 103 in Los Angeles