COP26 - भारताला महत्त्व दिल्यानं तुर्कीचे राष्ट्रपतींची ब्रिटनवर नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारताला महत्त्व दिल्यानं तुर्कीचे राष्ट्रपती झाले होते नाराज

इतर प्रतिनिधींसाठी बसची सोय केली होती तर ज्यो बायडेन, नरेंद्र मोदी, बोरिस जॉन्सन हे कारच्या ताफ्यातून ग्लास्गोला पोहोचले होते.

भारताला महत्त्व दिल्यानं तुर्कीचे राष्ट्रपती झाले होते नाराज

ब्रिटनमध्ये झालेल्या ग्लास्गो हवामान बदलाच्या परिषदेत अनेक देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. जगातील दिग्गज नेतेही या परिषदेत सहभागी झाले होते. हवामान बदलाच्या गंभीर समस्येशी कसा सामना करायचा यावर चर्चा या परिषदेत झाली. मात्र या परिषदेत तुर्कस्तानने ब्रिटनवर नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनने भारताला जास्त महत्त्व दिल्याचं म्हणत तुर्कीने नाराजी व्यक्त केली.

स्कॉटलंडची राजधानी ग्लास्गोमध्ये COP26 परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्रिटनकडे आवश्यक सुविधा या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नव्हत्या. त्यामुळे या परिषदेत सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना ब्रिटनने हॉटेल शेअर करण्याची विनंती केली होती. याशिवाय अनेक देशांच्या प्रमुखांना परिषदेच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची सोय करण्यात आली होती.

इतर देशांच्या प्रमुखांना बसची सोय आणि हॉटेलच्या सुविधांसाठी तडजोड करावी लागली. मात्र याला भारत, ब्रिटन आणि अमेरिका हे देश अपवाद होते. या तीनही देशांच्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांना त्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी होती. इतर प्रतिनिधींसाठी बसची सोय केली होती तर ज्यो बायडेन, नरेंद्र मोदी, बोरिस जॉन्सन हे कारच्या ताफ्यातून ग्लास्गोला पोहोचले होते. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी यावरूनच प्रश्न उपस्थित करत भारतासाठी वेगळी व्यवस्था का केली होती असं विचारलं आहे.

हेही वाचा: जगाच्या शेवटच्या टोकाला जाणारा रस्ता; पुढे जाण्यास नाही मार्ग

प्रोटोकॉलमध्ये भेदभावावर तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप एर्दोगन यांनी नाराजी व्यक्त केली होती. एर्दोगन हे रोममध्ये जी २० शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासोबत बैठकीनंतर स्कॉटलंडला येणार होते. मात्र त्यांनी थेट मायदेशी जाण्याचा निर्णय घेत ग्लास्गोला येणं टाळलं.

तुर्कीच्या राष्ट्रपतींनी म्हटलं की, काही सुरक्षेचे प्रोटोकॉल होते त्याची मागणी आम्ही केली होती. आम्हाला शेवटच्या क्षणी मागण्या मान्य होणार नाहीत असं सांगण्यात आलं. तर दुसऱ्या एका देशाला प्रोटोकॉलच्या विरोधात काही सुविधा दिल्या गेल्या याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पटणारं नव्हतं आणि ग्लास्गोला न जाण्याचा निर्णय़ घेतला. आमच्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी असा निर्णय घेतला असे तुर्कीच्या राष्ट्रपतींनी म्हटलं.

loading image
go to top