esakal | Corona : अँजेला मर्केल यांच्या मॅरेथॉन बैठका; जर्मनीत 28 तारखेपर्यंत वाढवला लॉकडाउन

बोलून बातमी शोधा

germany

वर्षभरानंतरही जर्मनीत कोरोना संसर्गाचा सामना करत असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Corona : अँजेला मर्केल यांच्या मॅरेथॉन बैठका; जर्मनीत 28 तारखेपर्यंत वाढवला लॉकडाउन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बर्लिन, ता. ४ (पीटीआय): वर्षभरानंतरही जर्मनीत कोरोना संसर्गाचा सामना करत असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधी आणखी तीन आठवड्याने वाढवून तो २८ मार्चपर्यंत कायम ठेवला आहे. परंतु संसर्गाचे प्रमाण कमी असलेल्या भागात व्यापारी प्रतिष्ठाने, अत्यावश्‍यक नसलेल्या सेवा काही अटींवर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा - 'खिसियानी बिल्ली खंबा नोचे'; राहुल गांधींचा ‘म्हणी’तून भाजपवर निशाणा!
जर्मनीतील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. मात्र सरकारने काही ठिकाणी सवलत देण्याचेही सूतोवाच केले आहे. काल देशातील वाढते रुग्ण पाहता चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी देशातील १६ राज्यातील गर्व्हनर यांच्याशी सुमारे ९ तास मॅरेथॉन चर्चा केली. आपापल्या राज्यात कोविड प्रतिबंधक मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले. जर्मनीत गेल्या आठवड्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच काही व्यवहारही सुरू करण्यात आले. येत्या रविवारपासून लॉकडाउनचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मर्केल यांनी या बैठकीत निर्बंध हळूहळू उठविण्याबाबत आणि स्थितीनुसार शिथिलता आणण्याची योजना देखील तयार केली आहे. जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटच्या डेटानुसार ११९१२ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधितांची संख्या २,४७१,९४२ झाली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ७१२४० वर पोचली आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढलेले असताना तेथे केवळ ५ टक्के लोकांपर्यंतच लस पोचू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - अमित शहांमुळे पुदुच्चेरीत मोठा राजकीय भूकंप; रंगास्वामींनी सोडली कमळाची साथ
तिसऱ्या लाटेची भीती
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मर्केल म्हणाल्या, की कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यशस्वी झालेले प्रयत्न सुरूच ठेवण्यात येतील. अन्यथा सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले जाईल. यावेळी त्यांनी तिसऱ्या लाटेचाही इशारा दिला आहे. तिसऱ्या लाटेचे पुरावे देखील मिळाल्याचे त्या म्हणाल्या. मागच्या वर्षीपेक्षा यंदाचा वसंत ऋतू अधिक चांगला असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी मार्च एप्रिल मे महिन्यात जर्मनी कोरोनाच्या बाबतीत पहिल्या पाच देशांत होता. ज्या ठिकाणी संसर्गाचे प्रमाण कमी आहे तेथे मर्यादित स्वरुपात दुकाने, संग्रहालय सुरू केली जातील. अर्थात लॉकडाउनमुळे १६ डिसेंबरपासूनच दुकाने बंद आहेत. याशिवाय नोव्हेंबर २०२० पासून रेस्टॉरंट, बार, स्पोर्ट्स सेंटर बंद आहेत.