आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय कोरोनावर मात अशक्य; संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जून 2020

संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांनी सर्व देशांना इशारा दिला आहे. कोरोना  विषाणूविरोधात एकट्याने देश लढू शकणार नाहीत, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं, असं ते म्हणाले आहेत.

न्यूयॉर्क- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा जगभरात झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांनी सर्व देशांना इशारा दिला आहे. कोरोना  विषाणूविरोधात एकट्याने देश लढू शकणार नाहीत, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं, असं ते म्हणाले आहेत. कोरोनाविरोधातील लढ्यात आंतरराष्ट्रीय परस्पर सहकार्याचा अभाव आहे. विषाणूविरोधात आम्ही एकट्याने लढू, हे धोरण त्याला हरवू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रामदेवबाबांनी आणलेलं कोरोनावरील औषध निघालं साध्या सर्दी-खोकल्याचं!
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी या संदर्भात एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, ""जागतिक सहकार्य हाच कोरोनावरील सर्वोत्तम उपाय आहे. स्वतंत्रपणे काम करणारे देश नियंत्रणाबाहेर जाणारी स्थिती निर्माण करत आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग चीनमध्ये सुरू झाला. तो युरोपनंतर उत्तर अमेरिका आणि आता दक्षिण अमेरिका, अफ्रिका, भारत असा पसरत आहे. काही जण कोणत्याही क्षणी दुसऱ्या लाटेची शक्‍यता व्यक्त करत आहेत. तरीही अद्याप या देशांमध्ये परस्परसंवादाचा अभाव आहे. सर्व देशांनी आपली शक्ती, कौशल्ये, उपचाराच्या पद्धती, सर्वापर्यंत लस पोचविण्याची यंत्रणा या प्रयत्नांना एकत्र आणले पाहिजे.'

सलून आणि पार्लर कधी सुरू होणार? वडेट्टीवार यांनी दिली माहिती
कोरोनाचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला आहे. या काळात बेरोजगारी, हिंसाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन या गोष्टी वाढल्या आहेत. या सर्वांवर मात करण्यासाठी सर्वच देशांची एकजूट महत्त्वाची आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरचे हे जगासमोरील दुसरे सर्वांत मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून सर्व देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रांकडून केला जात आहे. मात्र, सर्वच देश आपला राष्ट्रीय दृष्टिकोन सोडायला तयार नाहीत, असे गुटेरेस यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही विशिष्ट देशाचे नाव घेतले नाही. 

दरम्यान, जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत जगभरात 93 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकमेव महासत्ता असलेला अमेरिका कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 23 लाखांच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 1 लाख 23 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत ब्राझिल दुसऱ्या तर रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 56 हजारांच्या पुढे गेली असून जगात चौथ्या क्रमांकावर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona impossible to overcome without international cooperation UN chief warns