राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा पाहणाऱ्या सीक्रेट सर्व्हिसमध्ये कोरोनाचा शिरकाव, 130 जणांना लागण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

यातील बहुतांश कर्मचारी निवडणूक मोहिमेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. त्यावेळी अनेक अधिकारी आणि नागरिकही विना मास्क सामील झाले होते.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि व्हाइट हाऊसची सुरक्षा पाहणाऱ्या सीक्रेट सर्व्हिसच्या गार्ड्सना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. 'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार 130 हून अधिक सीक्रेट सर्व्हिस एजंट कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोना बाधितांच्या संक्रमणामुळे त्यांना लागण झाल्याचे सांगण्यात येते. हे सर्वजण आता क्वारंटाइन झाले आहेत. 

यातील बहुतांश कर्मचारी निवडणूक मोहिमेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. त्यावेळी अनेक अधिकारी आणि नागरिकही विना मास्क सामील झाले होते. हे कर्मचारी मागील तीन आठवड्यांपासून व्हाइट हाऊसच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही होते. 

हेही वाचा- नव्या संसदेचे भारतीय पद्धतीने सुशोभिकरण; अशी असणार आहे आपली नवी संसद

ट्रम्प यांनी 3  नोव्हेंबर रोजी एक पार्टी आयोजित केली होती. त्यामध्ये सहभागी झालेले बहुतांश लोक विना मास्क होते. या पार्टीनंतर ट्रम्प हे चीफ ऑफ स्टाफ यांच्यासमवेत असलेल्या बहुतांश सीक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा- राहुल गांधी हे गोंधळलेले नेते

'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, सीक्रेट सर्व्हिसचे किमान 30 अधिकाऱ्यांना नुकतीच लागण झाली होती. त्याचबरोबर 60 जणांना क्वारंटाइन होण्यास सांगितले होते. जूनमध्ये ओक्लाहोमा येथील तुलसामधील ट्रम्प यांच्या रॅलीनंतर अनेक सीक्रेट सर्व्हिस एजंट सेल्फ क्वारंटाइन झाले होते. जुलैमध्येही असेच झाले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी टाम्पामध्ये भाषण केले होते. मॅरीलेंड येथील सीक्रेट सर्व्हिसच्या ट्रेनिंग सेंटरवरही कोरोनाचा प्रसार झाला होता. अमेरिकेत सीक्रेट सर्व्हिसमध्ये 7000 कर्मचारी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona outbreak hits us secret service in united states of america