डिस्नेला अब्जावधी डॉलरचा फटका

पीटीआय
Tuesday, 11 August 2020

सप्टेंबरपासून थीम पार्कच्या भेटीचा कालावधी कमी केला आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे.दरम्यान,मार्च महिन्यापासून हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनामुळे वॉल्ट डिस्ने वर्ल्डला अब्जावधी डॉलरचा फटका बसला.

वॉशिंग्टन - कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मनोरंजन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यास वॉल्ट डिस्ने वर्ल्डचे थीम पार्क देखील अपवाद राहिले नाही. येत्या सप्टेंबरपासून थीम पार्कच्या भेटीचा कालावधी कमी केला आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनामुळे वॉल्ट डिस्ने वर्ल्डला अब्जावधी डॉलरचा फटका बसला. 

आठ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या मॅजिक किंगडम, हॉलिवूड स्टुडिओज, ॲनिमल किंगडम आणि एप्कोटचा भेटीचा कालावधी कमी करण्यात येत आहे. या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पाळणे, मास्क वापरणे, थर्मल चाचणी आदींचे पालन केले जाणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार मॅजिक किंगडम, हॉलिवूड स्टुडिओज आणि ॲनिमल किंगडम हे नेहमीच्या वेळेपेक्षा एक तास अगोदर बंद करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डिस्ने वर्ल्डचा महसूल घसरला
डिस्ने वर्ल्डचा महसूल ४० टक्क्यांनी कमी होऊन ११.७ अब्ज डॉलरपर्यंत घसरला आहे. समभागातून मिळणारे उत्पन्न देखील ९४ टक्के कमी झाले आहे. कोरोनामुळे मार्च  महिन्यापासून वॉल्ट डिस्नेचे थीम पार्कही अनिश्‍चित काळासाठी बंद केलेे. परिणामी थीम पार्क व्यवसायाला सुमारे ३.५ अब्ज डॉलरच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले असून प्रत्यक्ष तोटा २ अब्ज डॉलर एवढा झाला आहे. मर्यादित संख्येच्या निकषावर आशिया आणि युरोपातील थीम पार्क सुरू झाले. शांघाय डिस्ने थीम पार्क मे महिन्यात उघडले आणि पॅरिस व टोकिओ येथील डिस्नेलँड पाहुण्यासाठी खुले करण्यात आले. 

अशी घेणार खबरदारी
डिस्नेच्या थीम पार्कमध्ये मास्क घातल्याशिवाय श्रोत्यांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच पूर्वीच्या तुलनेत श्रोत्यांची संख्या देखील कमी कशी राहिल, याची खबरदारी घेतली जाणार आहे. स्वच्छता आणि सॅनिटायजेशनची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. गेल्या महिन्यात डिस्ने वर्ल्डमध्ये खाण्यापिण्यास बंदी घातली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona reduced Disney World's revenue