
डॉ. मसूद यांच्या या दाव्यानंतर चॅनेलची एँकर देखील हसायला लागल्याचं पहायला मिळतंय.
इस्लामाबाद : संपूर्ण जग कोरोनाच्या हाहाकाराने त्रस्त आहे. प्रत्येकाला कधी एकदा हे कोरोनाचे संकट निघून जातंय, असं वाटतंय. या दरम्यानच कोरोनाच्या उपचारांबाबत चित्रविचित्र असे दावे समोर येताना दिसताहेत. असाच एक दावा पाकिस्तानमधील एका डॉक्टरने केला आहे. शाहिद मसूद नावाच्या एका डॉक्टरने दावा केलाय की पॉपकॉर्न खाल्ल्याने कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढते.
Covidiot wisdom: Eat popcorn and increase immunity against the new coronavirus pic.twitter.com/i4vqcpuj2N
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) December 29, 2020
पॉपकॉर्न खाल्ल्याने वाढते इम्यूनिटी
पाकिस्तानी टीव्ही चॅनेल जीएनएन टीव्हीवर डॉ. शाहिद मसूद यांच्यासोबत एक लाईव्ह प्रोग्राम टेलिकास्ट केला जात होता. या प्रोग्राममध्ये डॉ. शाहिद मसूद यांनी दावा केलाय की पॉपकॉर्न खाल्ल्याने नव्या कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी इम्यूनिटी बुस्ट करण्यामध्ये मदत मिळेल. त्यांनी म्हटलं की, कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये जो नवा म्युटेशन आहे, जो N501Y आहे. त्याच्याविरोधात इम्युनिटी वाढवण्यासाठी पॉपकॉर्न्स खायला हवं. पॉपकॉर्न खा, कारण यामुळे इम्युनिटी वाढते, असं विधान त्यांनी केलंय.
हेही वाचा - Look Back 2020: जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकाही भारतीयाला नाही स्थान
सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
डॉ. शाहिद मसूद यांच्या या व्हिडीओला पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी ट्विट केलंय. पॉपकॉर्न खाऊन इम्युनिटी वाढवण्याच्या दाव्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. डॉ. मसूद यांच्या या दाव्यानंतर चॅनेलची एँकर देखील हसायला लागल्याचं पहायला मिळतंय.
भारतीय युझर्सनी उडवली थट्टा
नायला इनायत यांच्याद्वारे पोस्ट केलेला हा व्हिडीओ भारतात देखील खूपच व्हायरल होत आहे. यावर भारतीय युझर्स थट्टा-मस्करी करताना दिसताहेत. एका युझरने कमेंट करुन म्हटलंय की, आपण गुळवेल प्या, तेच बेस्ट राहिल. तर दुसऱ्या एका युझरने कमेंट करुन म्हटलंय की, विकसित देशांना एवढा साधा उपाय का सुचला नाहीये?
पाकिस्तानमध्येही सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन
पाकिस्तानमध्ये मंगळवारी कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन सापडला आहे. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनने बाधित असलेली एक व्यक्ती पाकिस्तानमध्ये आढळली आहे. हा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सर्वांत आधी सापडला होता. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 4,75,085 रुग्ण सापडले आहेत. यातील 4,25,494 रुग्ण कोरोनापासून मुक्त झाले आहेत. तर 9,992 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.