कोरोनावरील लस पुढच्या सहा महिन्यांत शक्य, संशोधन शेवटच्या टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

कोरोनावरील लस तयार करण्याच्या संशोधनात अमेरिकेने मोठे यश मिळविले असून, जुलै महिन्यात त्याच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.

वॉशिंग्टन, ता. ११ (पीटीआय) ः कोरोनावरील लस तयार करण्याच्या संशोधनात अमेरिकेने मोठे यश मिळविले असून, जुलै महिन्यात त्याच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ (एनआयएच) आणि ‘मॉडर्ना आयएनसी’ यांनी ही लस विकसित केली आहे. याची चाचणी ३० हजार स्वयंसेवकांवर करण्यात येणार आहे. यात काहींना प्रत्यक्ष लस टोचण्यात येणार आहे, तर काहींना अप्रत्यक्ष स्वरूपात लस देण्यात येईल.

शेवटच्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण चाचण्यांसाठी पुरेशा प्रमाणात औषधांचे डोस उपलब्ध केले आहेत, असे ‘मॉडर्ना’ने सांगितले. ही लस टोचण्यापूर्वी आधीच्या टप्प्यात कमी प्रमाणात दिलेल्या औषधाच्या मात्रेचा परिणाम जाणून घेतला जाणार आहे. आत्तापर्यंत झालेला अभ्यास हा पुढील टप्प्यातील संशोधनासाठी पुरेसा आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

कोरोनावर औषध तयार; दहा देशांकडून औषधांची मागणी

अन्य संशोधन पहिल्या टप्प्यात 
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठासह जगभरात संशोधन सुरू असून, ते अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. अंतिम टप्‍प्यात जाण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्यासाठी अजून चाचण्यांची गरज आहे, अशी अपेक्षा ‘एनआयएच’ने व्यक्त केली. या पैकी एकाही संशोधनातून खात्री देता येत नाही. मात्र, सर्व काही सुरळीत झाले तर या वर्षअखेरपर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध होईल का, याचे सकारात्मक उत्तर देता येईल, असे मत डॉ. जॉन मास्कोला यांनी ‘नॅशनल ॲकॅडमी ऑफ मेडिसिन’च्या बैठकीत व्यक्त केले. ‘एनआयएच’च्या लस संशोधन केंद्राचे ते मार्गदर्शक आहेत. 

दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडुत लॉकडाऊन वाढणार? राज्य सरकारकने दिली माहिती

संशोधनाचे टप्पे 
- ‘मॉडर्ना’ने सुरुवातीला मार्च महिन्यात ४५ स्वयंसेवकांवर लसीची चाचणी केली. 
- दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ३०० तरुणांची नोंदणी 
- लसीचा परिणाम ज्येष्ठांवर कसा होताे याचा अभ्यास आता सुरू झाला आहे. 
- सुरुवातीच्या अभ्यासात लसीचे दुष्परिणाम आणि वेगवेगळ्या मात्रांना लोकांची रोगप्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते, याची चाचपणी करण्यात आली. 
- मोठ्या प्रमाणावर चाचण्या झाल्यानंतर लस किती परिणामकारक ठरू शकते, हे समजणार आहे. 
- सरकारने विविध लसींसाठी औषधाचा मोठा साठा करण्यास सुरुवात केली आहे. 
- शेवटच्या टप्प्यातील चाचणीत यश मिळाले की लसीकरणाला प्रारंभ करणे शक्य होणार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine possible in next six month research in last phase