‘कोरोना’चा विळखा वाढला

पीटीआय
शनिवार, 25 जानेवारी 2020

७०० भारतीय विद्यार्थी अडकल्याची भीती
वुआन शहराची नाकाबंदी केलेली असल्याने तेथील भारतीय विद्यार्थ्यांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. या शहरात सुमारे ७०० भारतीय विद्यार्थी असून, त्यातील बहुतेक वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तथापि, बहुतेक विद्यार्थी सुटीनिमित्त भारतात परतले असल्याने नेमके किती भारतीय विद्यार्थी या प्रांतात अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढत असताना, भारतीय दूतावासाने गुरुवारी तेथील विद्यार्थ्यांसाठी मदतीसाठी संपर्क क्रमांक उघडला असून, या प्रांतातील चिनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत शहरात राहिलेल्या विद्यार्थ्यांना अन्न आणि इतर जीवनावश्‍यक वस्तू पुरवण्याची विनंती केली आहे.

आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू; तेरा शहरांतील सार्वजनिक वाहतूक बंद
बीजिंग - चीनमधील वुआन प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ झाली आहे. तर ८३० जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेरा शहरांची नाकाबंदी करण्यात आली असून, या शहरांत राहाणाऱ्या चार कोटी दहा लाख लोकांना त्याचा फटका बसला असल्याचे प्रशासनाने सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येथील वीस प्रांतीय विभागांमधून एकूण एक हजार ७२ संशयीत रुग्ण असून, यातील ८३० जणांना याची लागण झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या विषाणूमुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, यातील २४ जण हे एकट्या हुबेई प्रांतातील असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

मोठी बातमी : ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात केले बदल; नवे नियम...

कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे सरासरी वय ७३ वर्ष इतके आहे. मृतांमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ही ८९ वर्षांची आहे. तर, या विषाणूला बळी पडलेल्यांमध्ये सर्वात तरुण व्यक्ती ही ४८ वर्षांची आहे.

हुबेई प्रांतातील २९ प्रांतीय विभागांमधून हे संशयीत रुग्ण आढळत असल्याने या विषाणूचा होणारा प्रभाव रोखण्यासाठी चीनने तेरा शहरांमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, ही सर्व शहरे हुबेई प्रांतामधील आहेत. या शहरांत वुआन, हुआंगगांग, एझो, चिबी, झियान्टाओ, किआनजियांग, लिचुआन, झियानिंग, झियाऑन, एन्शी आणि झिजियांग या शहरांचा समावेश आहे. विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केलेल्या नाकाबंदीमुळे या शहरांमधील सुमारे चार कोटी दहा लाख लोकांना फटका बसला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्लीत एम्समध्ये विशेष कक्ष
नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात कोरोना विषाणूंच्या संशयीत रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने चिंचपोकळीतील कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus increase in bijing