जगभरात कोरोनाची दुसरी लाट! युरोप व अमेरिकेत पुन्हा निर्बंध

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 October 2020

युरोप व अमेरिकेत नव्याने निर्बंध लागू केले जात आहेत.

न्यूयॉर्क- कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. संसर्गाच्या पहिल्या टप्‍प्यांत जगातील बहुतेक सर्व देशांमधील व्यवहार बंद होते. पण अजूनही रुग्णसंख्या वाढत असल्याने काही देश व अमेरिकेतील राज्यांमध्ये उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. युरोप व अमेरिकेत नव्याने निर्बंध लागू केले जात आहेत.

कोरोनाच्या नव्या लाटेने न्यूयॉर्कवर पुन्हा लॉकडाउनची वेळ आली आहे. दोन चौरस मैलावर कोरोनाचे नवे ‘हॉटस्पॉट’ तयार झाले असून तेथील शाळा व आस्थापने बंद ठेवली आहे. स्पेनमधील माद्रिद व अन्य भागांत निर्बंध वाढविण्यापूर्वी माद्रिदमधील प्रवासावर मर्यादा आणली आहे. इटलीने एखाद्या लहान इमारतीलाही विलगीकरण स्थळ घोषित करण्यास सुरुवात केली आहे.

काय सांगता! कमी पगार असल्याने ब्रिटनचे पंतप्रधान देणार राजीनामा?

इस्त्राईल व चेक प्रजासत्ताक या देशांनी राष्ट्रीय लॉकडाउन लागू केला आहे. अन्य काही देशांनी अंशतः लॉकडाउन करणे, चाचण्या, संपर्क शोध व अन्य उपाय योजले आहेत. प्रतिबंधित विभाग जाहीर करणे हे नवे नसले तरी आधीच्या लॉकडाउनमुळे कमकुवत झालेली अर्थव्यवस्था, पुन्हा निर्बंध लागू करण्यास नागरिकांचा विरोध आणि दुजाभाव केला जात असल्याची काही लोकांची तक्रार या पार्श्‍वभूमीवर रुग्ण व मृत्यूसंख्या रोखण्याचा दबाव प्रशासनावर आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत जगात 4 कोटींच्या पुढे कोरोना रुग्ण आढळले आहेत. अमेरिका कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे. अमेरिकेमध्ये 80 लाखांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतात आतापर्यंत 76 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. असे असले तरी भारतात कोरोनाबाधिताचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus update Europe and america second wave of covid