चीनमध्ये स्थिती भयंकर; कोरोनाची 5 लाख जणांना लागण होण्याचा धोका, दिवसांत 139 बळी

टीम ई-सकाळ
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

कोरोनामुळे काल एका दिवसात १३९ रुग्णांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची संख्या ५ लाख १३ हजार १८३ आहे.

बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरसचा सामना करण्याचं आव्हान केवळ चीनच नव्हे तर, मानवजातीपुढं उभं राहिलं आहे. कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या एक हजार ५२३ वर पोचली आहे. हुबेई प्रांतात मृतांची संख्या सर्वाधिक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत देशातील एक हजार ५२३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १४३ जणांची प्रकृती गंभीर असून, ६६ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी दिवसभरात चीनमध्ये दोन हजार ६४१ जणांना कोरोनाची लागण झालेली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे या आजारातून बरे झाल्यामुळे एक हजार ३७३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. कोरोनामुळे काल एका दिवसात १३९ रुग्णांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची संख्या ५ लाख १३ हजार १८३ आहे. यापैकी १ लाख ६९ हजार ३९ जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा - दिल्लीत शाहीनबाग, चेन्नईत वॉशरमनपेट

दरम्यान, कोरोनामुळे चीनमधील नववर्षाच्या सुट्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. या काळात परदेशी गेलेले नागरिक आता परत येण्यास सुरुवात झाली आहे. अशा लोकांसाठी चीन सरकारने काल रात्रीपासून नवा नियम केला आहे. यानुसार बीजिंगमध्ये परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवस वेगळे ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही किंवा त्यांच्यामध्ये तशी लक्षणे आढळत नसली तरी १४ दिवस वेगळे राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. 

आणखी वाचा - चौदा वर्षे काढली जेलमध्ये, 40व्या वर्षी बनला डॉक्टर 

'डब्ल्यूएचओ’कडून चीनची पाठराखण 
कोरोना विषाणूच्या उद्रेकाबाबत माहिती देण्यात चीनकडून पारदर्शकता दाखविली जात नसल्याचा दावा अमेरिकेने केला होता. यावर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) काल चीनचा बचाव केला. चीनचे सरकार ‘डब्ल्यूएचओ’शी संपूर्णपणे सहकार्य करत असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी नमूद केले. कोरोना विषाणूच्या उद्रेकाबाबत चीनच्या अधिकाऱ्यांकडून खरी माहिती मिळत नसून त्यात पारदर्शकतेचा अभाव असल्यामुळे आपण निराश आहोत,’’असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेच्या प्रमुख लॅरी कुडलो यांनी नुकतेच केले होते. चीन अमेरिकेची मदत स्वीकारेल, असे आश्वासन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले होते. मात्र, ते आम्हाला मदत करण्याची परवानगी देणार नाहीत याची मला खात्री आहे, असे कुडलो म्हणाले होते. परंतु `डब्ल्यूएचओ’च्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख मायकल रायन यांनी चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाशी सहकार्य केल्याचे आज सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china 1500 deaths 5 lakh people affected hubei