भयानक : चीनमध्ये दीड हजार डॉक्टरांनाच कोरोनाची लागण, सहा जणांचा मृत्यू

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

वुहानमधील रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे स्थानिक डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे.

बीजिंग : कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे सहा वैद्यकीय कर्मचारी मृत्युमुखी पडले असून, एक हजार ७०० हून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे चीनकडून आज स्पष्ट करण्यात आले. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले संरक्षक कपडे आणि इतर साहित्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना धोक्याच्या स्थितीत काम करावे लागत आहे. त्याबाबत चीनमध्ये नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर चीनच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरील खुलासा केला असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डिसेंबरमध्ये कोरोनाच्या संभाव्य धोक्याचा इशारा सर्वांत प्रथम देणारे ली वेनलियांग या डॉक्टरचा सात फेब्रुवारी रोजी याच आराजामुळे मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जीवाची सरकारला काळजी नाही, असे आरोप झाल्यामुळे याबाबतची माहिती उघड करण्यासाठी चीन सरकारवर दबाव निर्माण झाला होता. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपमंत्री झेंग यिझींग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मंगळवारपर्यंत एक हजार ७१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी वुहान शहरात एक हजार १०२ जणांना, तर हुबेई प्रांतात इतर ठिकाणी चारशे जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारपर्यंत सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा - नारायण मूर्तींचे जावई इंग्लंडचे नवे अर्थमंत्री

वुहानमधील रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे स्थानिक डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. त्याच वेळी चीनमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक संरक्षण साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्वांचे आरोग्य धोक्यात आहे. डॉक्टरांना संरक्षण मुखवटे वारंवार बदलावे लागतात, मात्र त्याचा योग्य प्रमाणात पुरवठा केला जात नाही, असे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे आहे. वुहानमधील रुग्णालयातील एका डॉक्टरने दावा केला की, मी आणि माझ्या १६ सहकाऱ्यांमध्ये एका नव्या विषाणूची लक्षणे, (उदा. फुफ्फुसातील संसर्ग, खोकला इत्यादी) दिसून येत आहेत.

आणखी वाचा - या उद्योगपतींनं अंबानींनाही मागं टाकलं, घरावर उधळले...

नागरिकांमध्ये संताप 

  • वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या संरक्षक साहित्याचा तुटवडा 
  • कर्मचाऱ्यांना करावे लागते जीव धोक्यात घालून काम 
  • वुहानमधील शिक्षणक्षेत्रातील दहा तज्ज्ञांनी सरकारला लिहिले खुले पत्र 
  • पत्रात राजकीय सुधारणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची केली मागणी 
  • वुहान शहरात १,१०२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण 
  • वुहान वगळता हुबेई प्रांतात ४०० जणांना लागण 
  • सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची सरकारची माहिती 
  • सरकारच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china 1,700 medical officers get infected 6 dead