कोरोनावरील औषध जर्मनीत होणार उपलब्ध; ठरणार युरोपातील पहिला देश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यावर हे औषध देण्यात आलं होतं.

बर्लिन : कोरोना विषाणूविरोधातला लढा अद्याप सुरु आहे. कोरोना विषाणूविरोधात अनेक प्रभावी लसींना वेगवेगळ्या देशांमध्ये आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर लसीकरणास सुरवात देखील करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोरोनावरील प्रभावी औषधाची चर्चा दिसत नव्हती. मात्र, आता कोरोनावरील औषध वापरात आणण्याची चर्चा सध्या जर्मनीत सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यावर हे औषध देण्यात आलं होतं.

कोरोनाशी लढण्यासाठी जर्मनीने एँटीबॉडीवर आधारित एक औषध देशात आणलं आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीची संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण युरोपिय देशांमधून या प्रकारचे औषध आणू पाहणाऱ्या देशांमध्ये जर्मनी आघाडीवर आहे. एका अमेरिकन कंपनी 'रेजेनरॉन'ने तयार केलेले monoclonal antibody असं या औषधाचे नाव आहे. जर्मनीचे आरोग्य मंत्री जेन्स स्पहान यांनी जर्मन वृत्तपत्र बिल्ट ऍम सोनटॅगला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनायरसशी लढण्यासाठी सरकारने नवीन अँटीबॉडीवर आधारित असलेलं औषध विकत घेतलं आहे.

हेही वाचा - TikTokसह 59 चिनी अ‍ॅप्सवर भारतात 'पर्मनंट' बंदी

मोनोक्लोनल एँटीबॉडीज हे औषध वापरणारा जर्मनी हा युरोपातील पहिला देश असेल. या औषधाचा वापर पुढील आठवड्यापासून करण्यात येणार आहे. सुरवातीला याचा वापर विद्यापीठांतील दवाखान्यांमध्ये करण्यात येणार आहे. जर्मनीच्या केंद्र सरकारने या औषधाचे 200,000 खुराक विकत घेतले आहेत. ते 487 मिलियन डॉलर इतक्या किंमतीचे आहेत. स्पहान यांनी माहिती दिली की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांच्यावर याच एँटीबॉडी औषधाचा वापर करण्यात आला. पुढे ते म्हणाले की, हे औषध एकप्रकारे लसीसारखेच काम करते. सुरुवातीच्या काळात या अँटीबॉडीज घेतल्यास जास्त जोखीम असलेल्या रुग्णांना गंभीर परिस्थितीत जाण्यापासून वाचवता येते. 

ट्रम्प यांना कोरोना झाल्यानंतर थोड्या काळासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर अमेरिकेची कंपनी रेगेनरॉन कडून REGN-COV2 अँटीबॉडी देऊन उपचार करण्यात आले होते. जर्मनीत लसीकरणाच्या सुरवातीच्या टप्प्यात लसीच्या खुराकांचा तुटवडा असेल असं आधीच जाहिर केलेलं असतानाही स्पाहन यांना लसीच्या टंचाईबाबत रोषाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र जर्मन सरकारने अशी ग्वाही दिलीय की येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व जर्मनांना लस देण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Germany will be the first nation on EU ro use new antibody based drug