पाकिस्तानात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला, पण लॉकडाऊनचं काही ठरेना!

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

पाकिस्तानात आता कोरोनाग्रस्तांची संख्या साडे पाच हजाराच्या पुढे गेली असली तरी पाक सरकारकडून अद्याप लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही

पाकिस्तानात कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज वाढतच चालला आहे, पाकिस्तानात आता कोरोनाग्रस्तांची संख्या साडे पाच हजाराच्या पुढे गेली असली तरी पाक सरकारकडून अद्याप लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही.  सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरूच असून आता युरोप, अमेरिकेनंतर आशियाई देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार होत आहे. चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोनारुग्नानंतर चीनने कोरोनाचे संक्रमण रोखण्यात जरी यश मिळविले असले तरी आता कोरोनाचा कहर इतर आशियाई देशांमध्ये वाढताना दिसत आहे. भारतानंतर आता पाकिस्तानात सुद्धा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी इम्रान खान यांनी अजूनही पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर केलेले नाही. लॉकडाऊन वाढविण्याबाबतचा निर्णय आज पाकिस्तान सरकारने पुढे ढकलला. त्याच वेळी, देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून आता ५७१६ इतकी झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक झाली ज्यामध्ये सर्व प्रांतांचे मुख्यमंत्री आणि पाकव्याप्त काश्मीरचे नेतेही सहभागी झाले होते. बैठकीनंतर नियोजनमंत्री असद उमर यांनी पत्रकारांना सांगितले की बैठकीत लॉकडाऊनच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. यासंदर्भात पुढील चर्चेसाठी आज एक बैठक होणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : ड्रेनेज पाईपमधून कोरोना संसर्गाचा धोका ! वैज्ञानिकांचा अभ्यास सुरु 

पाकिस्ताननेही भारताशी असलेली वाघा सीमा बंद करण्याचा कालावधी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तेथील गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोरोना विषाणूमुळे ही सीमा २९ एप्रिलपर्यंत बंद राहील. करतारपूर कॉरिडोर २४  एप्रिलपर्यंत बंद राहील. मंत्रालयानेही २६ एप्रिलपर्यंत अफगाणिस्तान आणि इराणची सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने म्हटले आहे की कोरोना विषाणूमुळे ९६ लोक मरण पावले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, १३७८ लोक पूर्णपणे बरे झाले आहेत पण ४६ लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. 

हेही नक्‍की वाचा : कामगारांसाठी मोठा निर्णय ! दोन टप्प्यात मिळणार पाच हजार रुपये 

कोणत्या प्रांतात किती रुग्ण?
एका वृत्तानुसार पंजाब प्रांतात सर्वाधिक कोरोना विषाणूचे २६७२ रुग्ण आहेत तर सिंधमध्ये १४५२, खैबर-पख्तूनख्वा येथे ७४४, बलुचिस्तानमध्ये २३०, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये २२४, इस्लामाबादमध्ये १३१ आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ४० रुग्ण आढळले आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कमीतकमी २० डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यामुळे या धोकादायक कोरोना विषाणूची लागण झालेल्या वैद्यकीय कर्मचार्यांणची संख्या ५० झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus increase patient numbers still decision pending lockdown