Fight with Coronavirus : इटलीत आशेचा पहिला किरण; रुग्णांच्या संख्येत होतेय घट!

वृत्तसंस्था
Sunday, 5 April 2020

इटलीतील उत्तर लोम्बार्डी या भागाला कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. त्यामुळे सर्वाधिक लागण झालेले आणि मृत झालेल्यांची संख्याही याच भागातील आहे.

रोम : जगभरातील इतर देशांमध्ये हळूहळू कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. या व्हायरसमुळे सर्वाधिक बळी गेले ते इटलीमध्ये. शनिवारी (ता.४) ६८१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून इटलीत आतापर्यंत एकूण १५,३६२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर इटलीत आशेचा पहिला किरण दिसू लागला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीत अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. शुक्रवारी ४०६८, तर शनिवारी ३९९४ कोरोनाग्रस्तांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, अशी माहिती सिविल प्रोटेक्शन डिव्हिजनचे प्रमुख एंजेलो बोर्रेली यांनी दिली आहे.   

बोर्रेली पुढे म्हणाले, जेव्हापासून कोरोनाने थैमान घालण्यास सुरवात केली त्यानंतर पहिल्यांदाच रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही आमच्यासाठी दिलासादायक गोष्ट आहे. कारण आमच्या हॉस्पिटलवरील ताण आता कमी होणार आहे.

- चीनचा शेजारी असूनही तैवान कोरोनापासून वाचला कसा?

क्रिटिकल रुग्णांच्या संख्येत घट होणे हा महत्त्वाचा संकेत आहे. कारण आतापर्यंत राबविण्यात आलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांना यश मिळत आहे, असे मत साइंटिफिक काउन्सिल प्रमुख फ्रांको लोकतेली यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, इटलीत शनिवारी कोरोना संक्रमणाच्या २८८६ नव्या केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या ८८,२७४ एवढी झाली आहे. तर २०,९९६ रुग्णांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला आहे. 

- अजिंक्य राहणेकडून केळी दान करणाऱ्या शेतकऱ्याचे कौतुक

इटलीतील उत्तर लोम्बार्डी या भागाला कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. त्यामुळे सर्वाधिक लागण झालेले आणि मृत झालेल्यांची संख्याही याच भागातील आहे. त्यापाठोपाठ वेनेतो आणि आल्टो एडिगे यांचा क्रमांक लागतो. या सर्व भागांमध्ये खरेदीसाठी बाहेर पडणे सोडाच, साधा फेरफटका मारण्यासही स्थानिक सरकारने परवानगी दिली नव्हती.

फेब्रुवारीपासून परिस्थिती बिघडली

युरोपीय युनियन देशांपैकी एक असणाऱ्या इटलीने सर्वप्रथम देशातील सर्व विमान वाहतूक बंद केली होती. कोरोनाची पहिली केस येण्याअगोदरच त्यांच्या आरोग्य मंत्रालयाने टास्क फोर्सची स्थापना केली होती. पूर्ण इटलीमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. एवढे करूनही इटलीत कोरोनाने सर्वाधिक बळी घेतले. 

- Lockdown :... म्हणून मोदींनी माजी पंतप्रधान अन् विरोधी पक्षनेत्यांना लावले फोन!

२० फेब्रुवारीला कोरोना व्हायरसने आपले पाय इटलीत रोवण्यास सुरवात केली होती. त्या दिवशी लोम्बार्डीतील ३८ वर्षीय व्यक्तीची पहिली कोरोना केस दाखल झाली होती. मात्र, त्या आधीच कोरोनाने इटलीत प्रवेश केला होता, असंही काही आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Italy ICU patients decrease for first time since outbreak of Covid 19