कोरोना अपडेट; वाचा जगात कोठे काय घडले? अमेरिकेने घेतला मोठा निर्णय

टीम ई-सकाळ
गुरुवार, 12 मार्च 2020

अमेरेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमधून राष्ट्राला उद्देशून भाषण केले.

वॉशिंग्टन Coronavirus : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे अमेरिका धास्तावली असून, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ब्रिटन वगळता सर्व देशांच्या प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीस दिवसांसाठी ही बंदी असेल. दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोनाच्या विषाणूंची १ हजार ३०० लोकांना बाधा झाली असून ३७ जण मरण पावले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प यांनी आज व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमधून राष्ट्राला उद्देशून भाषण केले. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी मध्यरात्रीपासून हे नवे नियम लागू होतील, पण विविध वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जात मायदेशी परतणाऱ्या अमेरिकी नागरिकांसाठी देशाची दारे खुली असतील. आमच्या सरकारने हा विषाणू पसरू नये म्हणून ज्या पद्धतीने काळजी घेतली तशी काळजी घेण्यामध्ये युरोपियन संघ मात्र अपयशी ठरला आहे. चीन आणि दक्षिण कोरियातील परिस्थितीवर आपले बारकाईने लक्ष आहे. आमच्या देशातील नागरिकांनाही अनावश्‍यक परदेश दौरे टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लोकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करत ट्रम्प यांनी नागरिकांनी हात धुवावे, गर्दीपासून दूर राहावे अशा सूचनाही केल्या आहेत. ट्रम्प यांनी विषाणूचा फटका बसलेल्या लघुउद्योजकांसाठी काही आर्थिक सवलतीही या वेळी जाहीर केल्या.

आणखी वाचा - कोरोनाची दहशत, चार कोटींच्या कोंबड्या फुकट वाटल्या

आणखी वाचा - महत्त्वाची बातमी, कोरोनामुळं बदलले व्हिसाचे 'हे' नियम

जगभरात काय घडले? 

 • न्यूयॉर्कमधील सेंट पॅट्रीकमधील संचलन लष्कराने पुढे ढकलले 
 • हॉलिवूड अभिनेते टॉम हँकसह पत्नीलाही विषाणूचा संसर्ग 
 • कोरोना विषाणू मेड ईन चायना असल्याची अमेरिकेची टीका 
 • चीनमध्ये देशांतर्गत संसर्ग घटला पण परकीयांमुळेच विषाणूचा प्रसार 
 • ऑलिंपिकच्या आयोजनावर जपान ठाम 
 • थायलंडमध्ये कोरोनाचे नवे अकरा रुग्ण 
 • इराणने पाच अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत 
 • परदेशात ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश 
 • व्हिसा रद्दबाबत अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडून सूचना
 • इटलीमध्ये केवळ औषधांची दुकाने सुरू 
 • एल सेल्व्हाडोरची दारे परदेशी पर्यटकांसाठी बंद 
 • अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी जाहीर 
 • बांगलादेश क्रिकेट मंडळाने कार्यक्रम पुढे ढकलले 
 • ग्रीसमध्ये कोरोनाचा पहिला बळी 
 • कझाकस्तानमधील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द 
 • रेआल माद्रिदचा क्लब परिसर बंद 

कोरोना व्हायरस ही काही आर्थिक समस्या नाही, हा तात्पुरता प्रसंग असून आमचा देश आणि जग यावर निश्‍चितपणे मात करेल. लोकांच्या संरक्षणासाठी आम्ही केंद्रीय सरकारी यंत्रणा आणि खासगी क्षेत्राची पूर्ण ताकद पणाला लावतो आहोत. 
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष अमेरिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus update usa decision ban europe trip donald trump