कोरोनावरील लस अन् त्याची चाचणी; जाणून घ्या भारतासह कोणत्या देशात काय सुरुय

सुशांत जाधव
Sunday, 19 July 2020

सध्याच्या घडीला यावर कोणताही उपाय नसल्यामुळे लॉकडाउनच्या निर्बंधात सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरु आहेत. हा कोरोनावरील कायमचा उपाय नाही.

चीनच्या वुहानमधून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूनं जगाला विळखा घातलाय. जगभरातील जवळपास 14 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाखांहून अधिक लोकांनी या महा साथीच्या रोगामुळे आपला जीव गमावला आहे. सध्याच्या घडीला यावर कोणताही उपाय नसल्यामुळे लॉकडाउनच्या निर्बंधात सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरु आहेत. हा कोरोनावरील कायमचा उपाय नाही. यावरील लसीचा शोध लागत नाही तोपर्यंत जगात अनिश्चिततेच संकट घोंगावत राहिलं. या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आहोरात्र मेहनत करुन लसीचा शोध घेत आहेत. भारतासह रशिया, चीन, अमेरिका, ब्रिटन यासारख्या राष्ट्रांत कोरोनाविरोधात उपयुक्त ठरेल अशी लस निर्माण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. जगभरात जवळपास 130 पेक्षा अधिक लसीचा शोध घेण्यात आला असून यातील 20 लसींची वेगवेगळ्या टप्प्यात चाचणीला सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात जगभरातील कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी लसीच्या शोधकार्यात कोणत्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे.

‘अमेरिकेच्या निवडणुकीत चीन, रशियाचा हस्तक्षेप’

रशिया: सर्वात प्रथम लस उपलब्ध करुन देण्याचा दावा

रशियातील शास्त्रज्ञांनी कोरोनावरील लस सर्वात प्रथम शोधून काढू असा दावा केलाय. ऑगस्टपर्यंत जगातील पहिली कोरोनावरील लस तयार असेल, असे रशियन शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. मास्को स्टेट मेडिकल यूनिवर्सिटीने लस शोधकार्यात यश मिळाल्याचे म्हटले आहे. त्यांनी प्रयोग शाळेतील चाचणी यशस्वी केली आहे. 18 जून पासून संबंधित चाचणीला सुरुवात केली होती. लसीच्या मानवी चाचणीसाठी सहभाग नोंदवलेल्या पहिल्या तुकडीतील स्वयंसेवकांना 15 जुलैला घरी सोडण्यात आले. दुसऱ्या तुकडीतील स्वंयसेवकांना 20 जुलैला घरी सोडण्यात येणार आहे. 
 

चीन चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात
चीनी कंपनी सीनोव्हेक बायोटेकने मानवी चाचणी प्रयोग तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचला आहे. तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचणारा चीन हा जगातील पहिलाच देश आहे. अबू धाबीमध्ये 15,000 नोंदणीकृत स्वयंसेवकांना लस देण्यात आली.  28 दिवसांच्या आता दोन डोस दिल्यानंतर 100 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे निदर्शनास आले. चीनमध्ये एकूण चार वेगवेगळ्या लसीवर काम सुरु आहे. 
 

ब्रिटिश लस शोध मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात 
 

ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी, इम्पिरियल कॉलेजमध्ये मानवी चाचणीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग सुरु आहेत. चाचणीच्या दुसऱ्या फेरीत 105 लोकांना लस दिली जाणार असून नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या टप्प्यात जवळपास 6,000 लोकांना लस दिली जाईल. 

भारतात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रयोग सुरु
भारतामध्ये कोवॅक्सीन आणि जोकोव-डी नावाने दोन लसीवर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरु आहे. सुरुवातीच्या प्रयोगात ज्या स्वंयसेवकांना डोस देण्यात आले त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवलेला नसून भारतही कोविड लढ्यात यशाच्या मार्गाने पुढे जात आहे. मार्चपर्यंत मानव चाचणी पूर्ण करण्याचा संकल्प भारतीय कंपनीने केला असून मानवी चाचणीतील यशानंतर  100 मिलियन डोस तयार करण्याचं लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. 

दृष्टीकोन बदला... जग बदलेल​
 

अमेरिका अंतिम टप्प्यातील प्रयोगाची तयारी 
अमेरिकेत 27 जुलैच्या आसपास  मानव चाचणी पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली आहे. अमेरिकेतील 87 वेगवेगळ्या ठिकाणी चाचणी घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील सर्व खर्चाची जबाबदारी ही सरकारने उचलली आहे. कॅनडा स्थित मेडिकॅगोने देखील कोविड लस परीक्षणासाठी पहिल्या टप्प्यातील चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. 
 

जर्मनी, ऑस्ट्रेलियातील चाचणी प्रयोग दुसऱ्या टप्प्यात 
जर्मनीमध्ये बायोएनटेक, पीफायझर आणि फोसन फार्मा संभावित वॅक्सिन तयार करण्याच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे. तर ऑस्ट्रेलियातील पॅटी लिमिटेड आणि मेडिटॉक्स कंपनी पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus vaccines worldwide human trials All you need to know about studies