जगभरातील मृतांची संख्या वाढली; युरोपमध्ये सर्वाधिक 21 हजार मृत्यू

जगभरातील मृतांची संख्या वाढली; युरोपमध्ये सर्वाधिक 21 हजार मृत्यू

पॅरिस - संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना विषाणूने जगभरात घेतलेल्या बळींची संख्या आज तेहेतीस हजारांच्या वर गेली आहे. यातील एकट्या युरोपमध्ये २१ हजार मृत्युमुखी पडले असून त्यापैकीही एकट्या इटलीमध्ये दहा हजार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या या विळख्यापुढे इटली सरकारने जाहीर शरणागती पत्करली असून जगासमोरील हे संकट आणखी गडद झाले आहे. 

कोरोनाने सर्वाधिक थैमान युरोप खंडात घातले आहे. जगभरातील मृतांपैकी दोन तृतियांश जण युरोपमधील आहेत. इटली आणि स्पेनमध्ये दररोज सरासरी आठशे जणांचा मृत्यू होत आहे. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड हे देशही संकटात असून त्यांचे सरकार नागरिकांना घरी राहण्यासाठी आर्जवे करत आहेत. अमेरिकाही युरोपच्याच वाटेवर असून येथेही एकाच दिवसात मरण पावणाऱ्यांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. एरवी, हल्लेखोरांचा हल्ला होऊन लोक जखमी झाले तरी जगभरात धमकीचे इशारे देत फिरणारे हे देश विषाणूमुळे लोक शेकड्याने मरत असताना मात्र हतबल झालेले दिसत आहेत. इराणमध्येही एका दिवसांत मरण पावणाऱ्यांची संख्या शंभराच्या घरात आहे. कोरोनाचे केंद्र बनलेल्या इटलीमध्ये परिस्थितीमध्ये अद्यापही सुधारणा झालेली नाही. 

जगातील एक तृतियांश लोकसंख्या लॉकडाउनमुळे आपापल्या घरांमध्ये अडकून पडली असून या विषाणूने समाजाशी निगडीत प्रत्येक गोष्टीला धक्का दिल्याचे दिसत आहे. उद्योगधंदे बंद पडल्याने लाखो नोकऱ्या संकटात पडल्या आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य क्षेत्रावरील ताण वाढला आहे. जगात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे सहा लाखांवर गेली आहे. अद्याप अनेक ठिकाणी तपासी करण्याची सोय नसल्याने हा आकडा दिसत असल्यापेक्षा बराच मोठा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

स्पेनच्या राजकन्येचा मृत्यू 
कोरोना बळींच्या संख्येत सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये ८३८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या साडे सहा हजारांच्या जवळ येऊन ठेपली आहे. या मृतांमध्ये आज स्पेनच्या राजकन्येचा समावेश झाला. राजे फिलीप यांची चुलत बहिण असलेल्या राजकन्या मारिया तेरेसा (वय ८६) यांचा आज कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. यामुळे कोरोनाने घेतलेला राजघराण्यातील हा पहिला बळी ठरला आहे. ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या घटनेनंतर स्पेन सरकारने निर्बंध अधिक कडक केले आहेत. 

ही तर युद्धाला सुरुवात 
फ्रान्समध्ये मृतांची संख्या २३०० पर्यंत पोहोचली असून संसर्ग आटोक्यात येण्याची अद्याप चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळेच पंतप्रधान फिलीप यांनी ‘ही तर युद्धाला सुरुवात आहे,’ असा इशारा आपल्या जनतेला दिला आहे. फ्रान्समध्ये मृतांची संख्या अधिक असल्याचा सामाजिक संस्थांचा दावा आहे. कारण, अधिकृतपणे जाहीर होणारी संख्या ही केवळ रुग्णालयात मरण पावणाऱ्यांची आहे. मात्र, अनेक वृद्धाश्रम किंवा घरांमध्येही अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे संस्थांचे म्हणणे अहो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com