esakal | Coronavirus : डोनाल्ड ट्रम्प बोलले; चीनच्या आकडेवारीवर त्यांना शंका!
sakal

बोलून बातमी शोधा

Donald-Trump

रशियाची अमेरिकेला मदत
अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने त्यांना आज रशियाने वैद्यकीय मदत पुरविली. व्हेंटिलेटर, मास्क आणि इतर ६० टनांचे वैद्यकीय साहित्य घेऊन रशियाचे मालवाहू विमान आज अमेरिकेत उतरले. युद्धपातळीवर प्रयत्न न केल्यास पुढील दोन आठवड्यात अमेरिकेत दीड ते दोन लाख जणांचा मृत्यू होण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत आणीबाणीच्या परिस्थितीची तयारी सुरु असून त्याचाच भाग म्हणून रशियाकडून वैद्यकीय साहित्य मागविण्यात आले आहे.

Coronavirus : डोनाल्ड ट्रम्प बोलले; चीनच्या आकडेवारीवर त्यांना शंका!

sakal_logo
By
पीटीआय

चीनच्या आकडेवारीवर शंका
वॉशिंग्टन - चीन सरकारने त्यांच्या देशातील कोरोनाबळींच्या संख्येबाबत दिलेल्या माहितीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज संशय व्यक्त केला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे आपले चांगले मित्र आहेत, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, ‘त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवर विश्‍वास ठेवणे कठीण आहे. ते खरे बोलत आहेत, हे आपल्याला कसे कळणार?’. कोरोना विषाणूच्या फैलावाला दोन्ही देशांनी एकमेकांना जबाबदार धरले आहे. चीनने कोरोनाची माहिती लपविल्यानेच तो जगभरात पसरला असाही, अमेरिकेचा आरोप आहे. चीनमध्ये संसर्गाला सुरुवात होऊन तिथे आतापर्यंत ३३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. या तुलनेत युरोप आणि अमेरिकेत बऱ्याच उशीरा संसर्गाचा फैलाव होऊनही बळींची संख्या मात्र चीनपेक्षा कितीतरी अधिक आहे. अमेरिकेतील अनेक खासदारांनीही चीनने जाहीर केलेली आकडेवारी धादांत खोटी असल्याचा दावा केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जीनिव्हा - एकाच आठवड्यात जगभरातील मृतांची संख्या दुप्पट झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) चिंता व्यक्त केली आहे. संसर्गाला तीन महिने पूर्ण होऊनही तो अद्याप नियंत्रणात आला नसल्याने सर्व देशांनी या संकटाचा एकदिलाने सामना करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन ‘डब्लूएचओ’चे अध्यक्ष टेड्रॉस ॲथनम घेब्रेयेसूस यांनी केले आहे. 

टेड्रॉस ॲथनम घेब्रेयेसूस यांनी आज व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेत जगाला सावधगिरीचा इशारा दिला. ‘‘गेल्या पाच आठवड्यांमध्ये रुग्णांची आणि मृतांची संख्या अत्यंत वेगाने वाढल्याचे आपण पाहतो आहोत. यातून कोणताही मोठा देश सुटलेला नाही. गेल्या आठवड्यातील मृतांची एकूण संख्या या आठवड्यात दुप्पट झाली आहे. या विषाणूमुळे समाज, अर्थव्यवस्था आणि राजकारणावर गंभीर परिणाम होणार आहेत. दक्षिण अमेरिका, मध्य आशिया आणि काही देशांमध्ये संसर्ग वेगाने नसला तरी त्यांनी सज्ज रहावे,’ असे आवाहन घेब्रेयेसूस यांनी केले आहे. 

जगभरात अर्धा लाख व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकट्या युरोपमधील 
मृतांची संख्या तीस हजारांहून अधिक आहे. 

चाचणी अधिक कडक करणार
लंडन : कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या एकांतवासात असलेले ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत चाचणीप्रक्रिया अधिक सखोल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपल्या देशात बळींची संख्या वाढत असून आपल्याला एकत्र येऊन याच्याशी लढावे लागणार आहे. त्यासाठी केवळ चाचण्या करून भागणार नाही तर ही प्रक्रिया अधिक सखोल करावी लागणार आहे, असे जॉन्सन यांनी व्हिडिओत म्हटले आहे. 

बाधितांची संख्या नऊ लाखांवर
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या नऊ लाखांच्यावर गेली आहे. एकट्या अमेरिकेत बाधितांची संख्या दोन लाखांच्यावर गेली आहे. रुग्णवाढीचा हा वेग प्रचंड असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अमेरिकेत मृतांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. 

वृद्धांना धोका
जिनीव्हा - युरोपात कोरोनामुळे बळी पडलेल्यांपैकी ९० टक्के जणांचे वय साठपेक्षा अधिक होते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. वयोवृद्ध असलेल्यांना संसर्गाचा धोका अधिक असला तरी त्यांनी योग्य काळजी घेतल्यास धोका कमी करता येतो, असे संघटनेने म्हटले आहे. 

सुरक्षा परिषदेची बैठक होणार
न्यूयॉर्क - कोरोना संसर्गाच्या उद्रेकाबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. गेल्या महिन्यात जगभरात संसर्गग्रस्तांची संख्या प्रचंड वाढूनही चीनने सुरक्षा परिषदेची बैठक बोलाविली नव्हती. 

सहा आठवड्यांच्या बाळाचा मृत्यू
न्यूयॉर्क - कनेक्टिकट राज्यात सहा आठवड्यांच्या एका बाळाचा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित करून त्याची चाचणी घेतली असता त्याच्या शरीरात कोरोनाचे विषाणू आढळून आले. 

भारतीय अभियंत्यांचे कौतुक
वॉशिंग्टन - कमी किमतीमध्ये दर्जेदार व्हेंटिलेटर तयार केल्याबद्दल येथील भारतीय अभियंत्यांचे कौतुक होत आहे. या व्हेंटिलेटरची चाचणी होत आहे. येथील भारतीय अभियंत्यांच्या एका गटाने  तयार केलेले व्हेंटिलेटर फक्त चारशे ते पाचशे डॉलरमध्ये तयार करता येऊ शकते.

अमेरिकेत साधनांची कमतरता
वॉशिंग्टन - संसर्गाचा फैलाव वेगाने होत असल्याने अमेरिकेत वैद्यकीय उपकरणांची कमतरता निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने आतापर्यंत सव्वा कोटी मास्क, ५२ लाख चेहरा कवच (फेस शिल्ड), सव्वा दोन कोटी ग्लोव्हज्‌, ७,१४० व्हेंटिलेटर यांचा पुरवठा केला असून त्यांच्याकडील साठा जवळपास संपला आहे, असे येथील माध्यमांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांना तरी ही साधने मिळावीत, यासाठी ट्रम्प प्रशासनाचे हरप्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. 

अमेरिकेत विविध देशांतूनही मदतीचा पुरवठा होत आहे. उपचारांदरम्यान अत्यंत आवश्‍यक असलेल्या व्हेंटिलेटरची निर्मिती करण्यासाठी ११ कंपन्यांबरोबर करार करण्यात आले असून या कंपन्या युद्धपातळीवर काम करत आहेत.

आपल्याला शक्य तितक्या लोकांना वाचविण्यासाठी विषाणूचा फैलाव कमी करणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला वारंवार केवळ एक साधी सूचना करत आहोत - घरातच थांबा. अत्यावश्‍यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
- बोरीस जॉन्सन, पंतप्रधान, ब्रिटन