भारतातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग ब्राझीलपेक्षाही अधिक

सुशांत जाधव
Friday, 24 July 2020

आठवड्याभरात भारतातील आकडा हा ब्राझीलपेक्षा अधिक नोंद झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.  

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वेगाने वाढतोय. भारतातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग आता ब्राझीलपेक्षाही अधिक होताना दिसतोय. प्रत्येक दिवशी आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची भारतातील आकडेवारी ही ब्राझीलपेक्षाही अधिक असून हा वेग असाच राहिला तर चिंता अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.  प्रति दिन सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा हा अमेरिकेत नोंदवला जातोय. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून त्यापाठोपाठ ब्राझीलचा क्रमांक लागतो. या यादीत भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. 16 ते 22 जुलै या सात दिवसांत भारतात 2 लाख 69 हजार 969 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ब्राझीलमध्ये हा आकडा 2 लाख 60 हजार 962 च्या घरात आहे.

भाष्य : आत्मनिर्भरतेला असेही "इंधन'

आठवड्याभरात भारतातील आकडा हा ब्राझीलपेक्षा अधिक नोंद झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.  यापूर्वीच्या आठवड्यात भारतात 2 लाख 159 कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. तर ब्राझीलमधील आकडा हा 2 लाख 54 हजार 713 इतका होता.  ब्राझीलमध्ये बुधावारी रात्रीच्या आकडेवारीनुसार, 22 लाख 31 हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा हा  12 लाख 38 हजाराच्या घरात पोहचला आहे. दोन्ही देशांतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात आता जवळपास १० लाख इतके अंतर आहे.

कोरोना रुग्णांसाठी "जम्बो फॅसिलिटी'; लॉकडाउनमध्ये बेडच्या क्षमतेत वाढ

अमेरिकेत ब्राझील आणि भारतपेक्षाही बिकट परिस्थिती आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 41 लाखापेक्षा अधिक आहे. सध्याच्या घडीला चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अमेरिका, ब्राझील आणि भारत याठिकाणीच मोठ्या प्रमाणात दिसतोय. मागील आठवड्यात जगभरात जवळपास 16 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून यात 10 लाखाहून अधिक लोक हे अमेरिका, ब्राझील आणि भारत या तीन देशांतील आहेत. जगाच्या तुलनेत या तीन देशातील रुग्णांची संख्या ही 60 इतकी आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daily covid19 cases in india more than brazil only america ahead